‘त्या’ घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊत विरोधकांवर संतापले

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना झापलं आहे. (sanjay raut)

'त्या' घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊत विरोधकांवर संतापले
Sanjay Raut

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना झापलं आहे. साकीनाक्यातील दुर्देवी घटनेचं राजकारण करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on sakinaka rape incident)

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता काही ठिकाणी माणसं जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. ते टाळायला हवं. या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असं राऊत यांनी सांगितलं.

चिखलफेक करण्याचं राजकारण करू नका

ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं ते म्हणाले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा

पोलिसांना या पीडित महिलेचं स्टेटमेंट घेता आलं असतं तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. अधिक माहिती मिळाली असती. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे, असं सांगतानाच मी सकाळपासून पाहात आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत आहेत. काही भूमिका मांडत आहेत. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे. आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मग ती फाशीही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे. मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असं ते म्हणाले.

सरकारने कठोर पावलं उचलली

या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. तुलना करायला हरकत नाही. कारण यात एका महिलेने जीव गमावला आहे. तिच्या जीवनाची विटंबना झाली आहे. महाराष्ट्रातल्या मातीत त्या काळात छत्रपती महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे. अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारने अधिक कठोर पावलं उचलली पाहिजे. सरकार ते उचलल्या शिवाय राहणार नाही, असं त्यांनी सांगितलं. (shiv sena leader sanjay raut reaction on sakinaka rape incident)

 

संबंधित बातम्या:

Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना महाविकासआघाडी सरकारकडून राजाश्रय, अनेकजण गुन्हे दाखल होऊन मोकळे फिरतायत’

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया

(shiv sena leader sanjay raut reaction on sakinaka rape incident)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI