Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली.

Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
Sakinaka rape accused


Mumbai Rape मुंबई : मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.

या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस आयुक्त स्वत: साकीनाका स्टेशनमध्ये

साकीनाका पोलीस देखील या प्रकरणाचा प्रत्येक प्रकारे तपास करत आहेत. काल रात्री मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली.

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात फक्त एक आरोपी समोर आला आहे. पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत असले तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.

जर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली, तर तिच्या वक्तव्यानंतरच समजेल की या घटनेतील आरोपी एक होता की त्याच्यासोबत आणखी काही लोक सहभागी होते, असं पोलीस म्हणाले.

गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तपास सुरु आहेय. आणखी कोणी आरोपी आहेत का त्याचाही तपास घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. मात्र आता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

VIDEO : साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीचा CCTV

संबंधित बातम्या 

मुंबईच्या साकिनाका परिसरात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, पीडितेच्या गुप्तांगावर वार, संतापजनक घटना 

आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, हत्या करत देहाची विटंबना, डोळे काढले, हाताची बोटं दगडाने ठेचले 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI