मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा… संजय शिरसाट यांचं एका वाक्यात उत्तर काय?

विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप सन्मानजनक होईल. दोन्ही पक्षाला चांगल्या जागा मिळतील, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं. तसेच गजानन कीर्तिकर यांच्या विधानावर शिवसैनिक नाराज आहेत. निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कीर्तिकर यांची भेट घेऊन निर्णय घेतील, अशी माहितीही संजय शिरसाट यांनी दिली.

मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा... संजय शिरसाट यांचं एका वाक्यात उत्तर काय?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2024 | 2:23 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलणार असून नवीन मुख्यमंत्री राज्याला मिळणार आहे, अशा चर्चा वारंवार सुरू असतात. लोकसभा निवडणूक झाल्याने आणि विधानसभा निवडणूक दिवाळीत होणार असल्याने या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री खरोखरच बदलले जाणार आहेत काय? असा सवाल केला जात आहे. या सवालावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नाही असं उत्तर दिलं आहे. आमची महायुती मजबूत आहे आणि मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत आणि राज्यकारभार जोमाने करतील, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. काही चर्चा नाही. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते. मुख्यमंत्री खंबीर आहेत. मजबुतीने आहेत. निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याचे नो चान्सेस आहेत. एकदम घट्ट आहेत. जोरात काम करणारे मुख्यमंत्री आहेत. 24 तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.

यावेळी त्यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरही भाष्य केलं. अजितदादांनी फोन का केला? त्याने का केला नाही. याने का केला? अशा चर्चांना काही अर्थ नाही. या घटनेत दोन जणांचा जीव गेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याशी सरकार सहमत आहे. पोलीस प्रशासन त्या दृष्टीने काम करत आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

आरोप म्हणजे गुन्हेगार नाही

डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली आहे. हे पथक पुणे प्रकरणाचा तपास करणार आहे. पण सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. सध्याला पुण्याचं प्रकरण हाताळणं महत्त्वाचं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. तो भाग वेगळा आहे. या प्रकरणावर सर्वांचं बारीक लक्ष आहे. एखादा अधिकारी पात्र वाटला तर त्याच्याकडे चौकशी दिली तर चुकीचं नाही. त्यात काही गैर समजू नये. आरोप आणि चौकशी दोन वेगळे भाग आहेत. तसं पाहिलं तर काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तेही मंत्रिमंडळात राहिले होते ना? त्यांना आपण फाशी दिली का? एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी लागली म्हणजे तो गुन्हेगार झाला असं नाही. या प्रकरणाचा छडा लागू द्या. अधिकाऱ्याला डिस्टर्ब करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

सरकार आमचंच येणार

इंडिया आघाडीने त्यांच्या निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी ठरवली होती. त्यात घटना बदलणार हा मुद्दा घेतला. दलित समाज आपल्या बाजूने आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण कोणत्याही परिस्थितीत घटना बदलणार नाही हे मोदींनी स्पष्ट केलं होतं. महागाई आणि इतर मुद्द्यांपेक्षा निवडणुकीत कोणता मुद्दा पॉवर फुल आहे, हे विरोधकांनी पाहिलं. त्यामुळे त्यांनी संविधान बदलण्याचा मुद्दा निवडणुकीत घेतला. गेल्या दहा वर्षापासून मोदींचं सरकार आहे. त्यांनी संविधान बदललं असतं. पण तेव्हा त्यांनी केलं नाही. इंडिया आघाडीच्या मुद्द्याने दलित समाज विचलित झाला खरा. पण त्याचा परिणाम एनडीएवर पडणार नाही. लोकं समजदार आहेत. योग्य ते मतदान केलं आहे. येणारं सरकार एनडीएचंच असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.