Mumbai News : वरळीत भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा, नेमकं काय घडलं?

Shiv Sena UBT vs BJP : वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला आहे. त्यामुळे वरळीत पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Mumbai News : वरळीत भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Shivsena BJP Conflict in Worli
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 05, 2025 | 4:54 PM

मयुरेश जाधव, मुंबई :  मुंबईत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. कामगार युनियनवरून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले असल्याचे समोर आले आहे. वरळी परिसरातील हॉटेल सेंट रेजिस मध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. गेल्या अनेक वर्षांपासून या हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाची यूनियन कार्यरत आहे. मात्र भाजपकडून याच हॉटेलमध्ये पुन्हा भाजपची युनियन बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला विरोध करताना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे मोठा राडा झाला. सध्या हॉटेलच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेलबाहेर घोषणाबाजी देखील करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपने लावलेला बोर्ड फाडला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे कामगार फोडण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधील कामगारांचा समावेश आहे. याअगोदर बांद्रा येथील ताज लँड हॉटेलमध्ये वाद झाला होता. बांद्रा येथे भाजपने आपला फलक आणि झेंडा लावला होता, मात्र वरळीत ठाकरेंच्या सेनेने विरोध करत भाजपने लावलेला बोर्ड फाडून काढला.

ठाकरे गटाचा भाजपला इशारा

गेल्या अनेक वर्षांपासून आमची युनियन या हॉटेलमध्ये कार्यरत आहे, मात्र भाजप सत्तेचा वापर करत दुसरी यूनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. हॉटेलमधील कर्मचारी हे भाजपकडे येतायत असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. कोणतेही कामगारांचे नियम न पाळता भाजप सत्तेचा वापर करत आहे असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने अनियमितपणे किंवा अनधिकृतपणे युनियन स्थापन केली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा भाजपला देण्यात आला आहे.

पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात

दरम्यान, ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा सेंट रेजिस हॉटेलला आले आहेत, भाजपकडून पुन्हा बोर्ड लावला जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हॉटेलमधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढा अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हॉटेलबाहेर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.