मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका

मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका

मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना, देशासह राज्यात राजकीय हालचालींना तुफान वेग आला आहे. कुठे युती, तर कुठे आघाडी बांधण्यासाठी धावाधाव सुरु आहे. अशातच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या स्वतंत्र तीन बैठका आहेत. राज्यातील तीन महत्त्वाच्या पक्षांच्या एकाच दिवशी मुंबईत महत्त्वाच्या बैठका असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळासह राज्याभरातील जनतेचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे.

राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत आज बैठक घेणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. लोकसभा निवडणूक आणि महाआघाडीच्या रणनितीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या लोकसभेसाठीच्या संभाव्य उमेदवारांचीही चाचपणी होण्याची शक्यता आहे.

मनसेची बैठक

मनसेचे सर्व सरचिटणीस, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कामगार संघटनांचे नेते इत्यादी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. मनसेचं मुख्यालय असलेल्या राजगडावरच सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीकडे आणि बैटकीनंतर राज ठाकरे काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आघाडीत जाण्यासंदर्भात मनसे काय निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यासंदर्भातच राज ठाकरेंच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेनेची बैठक  

शिवसेना आणि भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार का, हा प्रश्न सर्वांना सतावत असताना, भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी थेट फोन करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यातही भाजपसोबत युतीची चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. या सर्व वेगवाना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या सर्व खासदारांची आज ‘मातोश्री’वर बैठक घेण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीत युतीसंदर्भात काय चर्चा होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI