Special Story : इलाहींच्या आठवणींनी ‘दाजी’ भावनावश, गझलनवाज भीमराव पांचाळेंच्या तोंडून जमादारांचे न ऐकलेले किस्से

Special Story : इलाहींच्या आठवणींनी 'दाजी' भावनावश, गझलनवाज भीमराव पांचाळेंच्या तोंडून जमादारांचे न ऐकलेले किस्से
भीमराव पांचाळे आणि इलाही जमादार

'या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो, आकाशाला कायमचे टाळावे म्हणतो'... इलाहीच्या गझलेप्रमाणे वेदनेचा हा सखा, वेदनेला कवटाळून आता खरोखरच निघून गेलेला आहे ... आकाशाला कायमचे टाळून, क्षितिजाच्याही पल्याड, असं भीमराव सरतेशेवटी म्हणाले.

Akshay Adhav

| Edited By: Yuvraj Jadhav

Feb 06, 2021 | 11:11 AM

मुंबई : काळजाला झालेल्या जखमाही सुगंधी असू शकतात असं सांगणारा गझलकार काळाच्या पडद्याआड गेलाय. आपल्या आशयपूर्ण गझलांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारा तसंच गझलेच्या माध्यमातून पुस्तकातून वाचलेली माणसं गेली कुठे? हे प्रश्न विचारण्याचा धाड ठेवणारा तथा एकाच गझलेमध्ये प्रेम विरह आणि सामाजिक प्रश्न विचारुन रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे गझलकर इलाही जमादार अनंताच्या प्रवासाला गेलेत. त्यांच्यात शब्दात सांगायचं तर ‘आकाशाला कायमचे टाळून, क्षितिजाच्याही पल्याड….!’ (Special report on Gazalkar Elahi jamadar And Bhimrao Panchale FriendShip)

इलाही जमादार यांच्या गझला प्रामुख्याने गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गायल्या. किंबहुना भीमरावांमुळे इलाहींच्या शब्दाची ताकद महाराष्ट्राला कळाली. इलाहींचे शब्द आणि भीमरावांचे स्वर हे जणू समीकरण झालं होतं. भीमरावांचा गझलेचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात इलाहींची गझल झाली नाही, असा एकही कार्यक्रम झाला नसेल. त्यात ‘अंदाज आरशाचा वाटा खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा’, ही गझल तर एव्हरग्रीन… भीमरावांच्या गझलांच्या कार्यक्रमामध्ये या गझलेची फर्माईश झाली नसेल ही अशक्यप्राय गोष्ट… भीमरावांकडून या गझलेचा आनंद म्हणजे स्वर्गीय सुख….

इलाही यांच्या जाण्यानंतर भीमराव पांचाळे यांच्यावर फार मोठा दुखचा डोंगर कोसळलाय.” माझा 40 वर्षांपासूनचा सखा, सोबती मला अचानक सोडून निघून गेलाय. त्याच्या आयुष्यात त्याने रसिक प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिला, समाधान दिलं रसिकांनीही त्याच्यावर भरभरुन प्रेम केलं. त्याच्या शब्दाची ताकद फार मोठी होती. तो दोन ओळीतून आयुष्याचं तत्वज्ञान सांगायचा. तो ओळीतून समाजाला भरकटलेल्या समाजाला थेट प्रश्न विचारायचा तर कधी दोन ओळीतून आपल्या प्रेयसीला भुलवायचा. ‘सांजवेळी संगतीला एकदा येऊन जा, भैरवी गाईन मी तू मारवा गाऊन जा…’, असं जर प्रेयसीला म्हटलं तर कोणती प्रियसी येणार नाही तुम्हीच सांगा….एकंदरितच प्रेम, विरह, वेदना, सामाजिक भाष्य हे सगळं इलाहींनी त्यांच्या गझलेतून केलं, असं भीमराव पांचाळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

इलाहींच्या पुस्तक प्रकाशनासाठी भीमरावांची धावपळ, गझलेची रंगलेली मैफल

खास आठवणी जागवताना भीमरावांचा गळा दाटून आला होता. 25 ते 30 वर्षांपूर्वीच्या मैफिलीची आठवण सांगताना भीमराव म्हणाले, “‘जखमा अशा सुगंधी’, हे इलाहींनी पुस्तक लिहिलं होतं. मात्र पुस्तक प्रकाशानसाठी आम्हाला प्रकाशकच मिळेना. खूप प्रकाशकांचे उंबरठे झिजवले. मात्र कुणी तयार होईना. अखेर दीपक प्रकाशनाने पुस्तक प्रकाशिक केलं. ज्या पुस्तकांची नंतर प्रचंड विक्री झाली. हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या उपस्थितीत दामोदर हॉलला पार पडला. यावेळी पाडगावकरांच्या उपस्थितीत, इलाहीच्या साथीने रंगलेली मैफल माझ्या आयुष्यात कधीच विसरु शकत नाही, असं भीमराव पांचाळे म्हणाले.

इलाही-भीमरावांचं मेहुणे-दाजींचं नातं…

इलाही जमादार भीमराव पांचाळे यांच्या पत्नी गीता यांना बहीण मानायचे. त्याही इलाहींना आपला मोठा भाऊ समजून त्यांचं सगळं करायच्या. इलाही मुंबईला आले की बहिणीकडे राहत. मग जेवणावळी, गप्पा आणि गझलांची मैफल रंगायची… या सगळ्यांमधून वेगळाच अर्थ काढला जाई. वेगळेच उद्गार कानावर पडत … “अच्छा ! म्हणजे, इलाहीच्या बहिणीशी भीमरावांनी लग्न केले म्हणून हे सगळे आहे तर! “इलाही आणि भीमरावांना याची मोठी गंमत वाटायची.. त्यांना या नात्याचा आनंद पण व्हायचा…

मुंबईच्या गर्दीला घाबरणारे इलाही

मुंबईच्या गर्दीला इलाही खूप घाबरायचे. इथली लोकलमध्ये चढणारी माणसं, त्यांची धावपळ-घाई… हे सगळं पाहून इलाहींना मुंबई आवडायची नाही… ते खूप कमी वेळा मुंबईत यायचे. अगदी काही रेकॉर्डिंग असेल तर ते पुण्याहून मुंबईला यायचे. मुंबईत आलं की हक्काचं घर म्हणजे भीमरावांचं… मग अनेकदा मांसाहराचा उत्तम बेत केला जाई… मासे खायला इलाहींना आवडायचं. एक दोन दिवस इलाही चांगले रमायचे… पण त्यानंतर त्यांना मुंबईत रहायला आवडायचं नाही… पण ते पुण्याची वाट धरायचे, अशा आठवणी भीमरावांनी सांगितल्या.

कल्पनेची उडान भरताना वास्तवाचं भान सुटू दिलं नाही

इलाहींचं मोठेपणा सांगताना भीमराव म्हणतात, “प्रतिभेचे अमोघ देणे लाभलेला इलाही कल्पनेची उत्तुंग उडान भरतांनासुद्धा वास्तवाचे भान आणि सामाजिक प्रश्नांची जाण सुटू द्यायचा नाही. त्यामुळेच , उर्मिलेचे चौदा वर्षे एकाकी राहणे हाच त्याला खरा वनवास वाटायचा… ” पुढे बोलताना भीमराव म्हणाले, “हवेचा हुंदकाही त्याला ऐकू यायचा, वाळूचे घर बांधायचं स्वप्न तो बघायचा, वाटेत पडलेल्या प्रकाश-किरणांनाही ठेचाळायचा, वेदनेचे चिरंजीवित्व अनुभवायचा, आगीच्या उठलेल्या लपटी त्याला बहरलेल्या ज्वाळा वाटायच्या, त्याचे काळीज बहारायचे ते जखमांनी, एखादी सुंदर सांज मागायचा ती सुद्धा वेदनांनीच बहरलेली, आसवांना शिस्त लावून आपला हुंदका बंदिस्त ठेवू शकायचा, याचनेला गळफास आणि कुडीला कारावास समजायचा तो , जगणे म्हणजे श्वासांचा अघोरी खेळ वाटायचा त्याला…व्यथेचा कैफ घेऊन जगण्याचा हा अघोरी खेळ त्याने अखेर आटोपता घेतला…!”

इलाहींचं ही गझल भीमराव कधीच का गायले नाहीत…?

सुफियाना तबीयतची एक रचना “…निघुनी जावे म्हणतो”… ही रचना इलाहीने मला दिली होती… धुनसुद्धा खूप मस्तं जमून आली होती. या रचनेचे शब्द होते, ‘या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो, आकाशाला कायमचे टाळावे म्हणतो’ मैफिलीत ही गज़ल भीमरावांनी कधीच गायली नाही. अनेकवेळा त्यांना ही गझल गाण्याचा आग्रह झाला परंतु आजवर त्यांनी ही गझल गायली नाही. ही गझल गाण्याचा आग्रह झाला की पुढच्या वेळी नक्की म्हणेन, असं म्हणत ते वेळ मारुन न्यायचे… पण मनातून ही गझल त्यांना गावीशी वाटत नव्हती. का गावीशी वाटली नाही?, हे मात्र अनाकलनीय आहे माझ्यासाठी, असं सांगत आता इलाही गेल्यानंतर ही गझल गाण्याचा गाण्याचा हौसला कुठून आणू मी?, असं भीमराव म्हणाले.

गज़ल-फळांनी लगडलेली फांदी निखळली

गज़लच्या महावृक्षाची, गज़ल-फळांनी लगडलेली फांदी निखळली. व्यथेचा कैफ घेऊन जगण्याचा हा अघोरी खेळ त्याने अखेर आटोपता घेतला, अशा शब्दात आपल्या मित्राच्या जाण्याने झालेल्या दुखा:ला भीमरावांनी वाट मोकळी करुन दिलीय. पहाटे-पहाटे वाईट स्वप्न पडावे आणि ते तंतोतंत खरे ठरावे अशी ती सकाळ इलाहीच्या मरणाची भयंकर वार्ता घेऊन आली आणि सदोतीस वर्षांच्या आमच्या मैत्रीला तिने आठवणींच्या कप्प्यात कायमचे ढकलून दिले, असं सांगताना भीमराव भावूक झाले होते.

इलाही क्षितिजाच्याही पल्ल्याड गेले…

‘या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो, आकाशाला कायमचे टाळावे म्हणतो’… इलाहीच्या गझलेप्रमाणे वेदनेचा हा सखा, वेदनेला कवटाळून आता खरोखरच निघून गेलेला आहे … आकाशाला कायमचे टाळून, क्षितिजाच्याही पल्याड, असं भीमराव सरतेशेवटी म्हणाले.

गझलकार इलाही जमादार यांचे निधन, सांगलीतील मूळ गावी अंत्यसंस्कार होणार

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें