गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, 2200 जादा बसेस सोडणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. यंदा एसटीने 2 हजार 200 बसेस सोडल्या असून याच्या बुकींगसाठी येत्या 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, 2200 जादा बसेस सोडणार


मुंबई : मुंबई व उपनगरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. हेच लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने 2 हजार 200 बसेसची सोय केली आहे. येत्या 28 ऑगस्टपासून 2 सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात चाकरमान्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या जादा बसेसच्या बुकींगला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. शहरात किंवा कामानिमित्ताने घराबाहेर असणारा प्रत्येक माणूस हा गणेशोत्सवानिमित्त एकदा तरी गावी जातो. त्यावेळी गावी जाण्यासाठी रेल्वेसह, एसटी बसेसचे आरक्षण मिळत नाही. हेच लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. यंदा एसटीने 2 हजार 200 बसेस सोडल्या असून याच्या बुकींगसाठी येत्या 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे बुकींगही 27 जुलैपासून करता येणार आहे.

20 जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरुवात

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी ग्रुपने बसचे बुकींग करतात. अशा या ग्रुप बुकींगसाठी उद्या 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या ग्रुप बुकींगसाठी चाकरमान्यांनी जवळच्या एसटी आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

मुंबई व उपनगरातील 14 ठिकाणाहून जादा बसेस

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी रात्रदिवस कार्यरत असणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरुन जादा  बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके  (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात आले आहे.  त्याशिवाय प्रवासादरम्यान प्रवाशांना तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI