तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, पक्ष बळकवायचा होता, आमदारांना गुप्त फोन, बड्या नेत्याच्या बॉम्बने मोठा भूकंप

शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरेंनी आमदारांना गुप्तपणे फोन करून उपमुख्यमंत्री पद, अर्थखाते आणि राष्ट्रवादी पक्ष बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा थोरवे यांचा दावा आहे. तटकरे हे कपटी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, पक्ष बळकवायचा होता, आमदारांना गुप्त फोन, बड्या नेत्याच्या बॉम्बने मोठा भूकंप
| Updated on: Nov 07, 2026 | 2:32 PM

महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आमदारांना गुप्त फोन केले होते. तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, अर्थ खातं स्वत:कडे घ्यायचं होतं आणि राष्ट्रवादी पक्ष बळकवायचा होता, असा खळबळजनक आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. थोरवे यांनी मोठा बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोरवे यांच्या आरोपांना तटकरे काय उत्तर देतात? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे हा खोटारडा माणूस आहे. कपटी डाव खेळणारा आहे. अजितदादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी त्याच दिवशी सर्व आमदारांना फोन केले होते. आमदार आपल्या सोबत कसे येतील याचा प्रयत्न केला होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंना उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं ताब्यात घ्यायचं होतं. त्यांना पक्षही ताब्यात घ्यायचा होता. पण दु:खाचा डोंगर असताना सुद्धा सुनेत्रा वहिनी अतिशय अलर्ट होत्या. त्यांनी तिसऱ्या दिवशीच शपथविधी घेतला आणि हा विषय टाळला गेला, असा दावाच महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

Loading...

कपटी आणि धूर्त माणूस…

सुनील तटकरे हा कपटी आणि धूर्त माणूस आहे. हा माणूस अजित दादा गेल्यावर दादांच्या घातपातावर एकही शब्द बोलला नाही. चकार शब्दही काढला नाही. नंतर मात्र आता यूटर्न घेतला आहे. अजितदादांनी मला सर्व सांगितलं होतं, असा कांगावा हा माणूस करत आहे. पण तटकरे हे खोटं बोलत आहेत, असा दावाही थोरवे यांनी केला.

13 वेळा बैठका, तटकरे नव्हते

मला मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादा आणि शरद पवार गटामध्ये विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या होत्या. अजित पवार यांनी शरद पवार आणि पवार गटाच्या इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. या एकाही बैठकीला विश्वासू सहकारी म्हणून अजितदादांनी एकदाही तटकरेंना नेलं नाही. तुम्ही माहिती घ्या. आता मात्र, तटकरे खोटं बोलत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us