Mumbai Marathon 2026: मुंबई मॅरेथॉनचा विजेता कोण? मिळाली तब्बल इतकी बक्षिसाची रक्कम
मुंबई मॅरेथॉन ही आशिया खंडातील सर्वांत मोठी मॅरेथॉन आहे. रविवारी पहाटे 5 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. जगभरातील धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या मॅरेथॉनच्या विजेत्याला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठी मॅरेथॉन आणि जगभरातील धावपटूंना आकर्षण असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ रविवार पार पडली. आज (रविवार, 18 जानेवारी) पहाटे 05.05 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत ही मॅरेथॉन स्पर्धा भरविण्यात येत आहे. सीएसएमटी-हुतात्मा चौक-चर्चगेट-मरिन ड्राइव्ह-पेडर रोड-हाजी अली-वांद्रे वरळी सी-लिंक- माहीम- प्रभादेवी-हाजी अली ते सीएसएमटी असा या स्पर्धेचा मुख्य मार्ग आहे. या स्पर्धेचे विविध इथिओपियाचा लांब पल्ल्याचा धावपटू ताडू अबाते डेमे याने उत्कृष्ट कामगिरी करत आंतरराष्ट्रीय एलिट पुरुषाचा किताब जिंकला आहे. त्याला बक्षीस म्हणून तब्बल 45 लाख रुपये मिळाले आहेत.
ताडू हा इथियोपियाचा 28 वर्षीय लांब पल्ल्याचा धावपटू आहे. मुंबई मॅरेथॉनच्या आधी त्याने प्रमुख आंतरराष्ट्रीय रोड रेसमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. यामध्ये पोडियम फिनिशिंगचाही समावेश आहे. ताडूने गेल्या वर्षी मेक्सिको सिटी मॅरेथॉन जिंकली होती. मुंबई मॅरेथॉनमध्ये ताडूनंतर लिओनार्ड लंगातने दुसरं स्थान पटकावलं. त्याला जवळपास 22 लाख रुपये बक्षीस मिळालं आहे. मेहवी कॅसेट वाल्दामेरियाने तिसरं स्थान पटकावलं असून त्याला 13 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
मॅरेथॉनच्या भारतीय वर्गात डॉ. कार्तिक करकेराने बाजी मारली असून बक्षिस म्हणून त्यांना 5 लाख रुपये मिळाले आहेत. तर अंश थापाने दुसरं स्थान मिळवलं आहे. त्याला चार लाख रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर प्रदीप चौधर असून त्याला तीन लाख रुपये मिळाले आहेत.
मुंबई मॅरेथॉनमध्ये 65 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. 42 आणि 21 किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली होती. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला होता. सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटींनीही भाग घेतला होता. सकाळी 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून या ड्रीम रनला फ्लॅग दाखवण्यात आला. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रनमध्ये अभिनेता आमिर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला.
