ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, 5 जुलैला वरळीत काय घडणार? उत्सुकता शिगेला
ठाकरे बंधूंचा ५ जुलै २०२५ रोजी वरळी येथे होणारा 'विजयी मेळावा' महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे मांडला जात असून, या मेळाव्यातून राज्यातील मराठी माणसाची एकजूट दृढ होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंचीच चर्चा सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत शनिवारी ५ जुलै २०२५ रोजी विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. येत्या ५ जुलै २०२५ रोजी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे होणाऱ्या ‘विजयी मेळाव्या’ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मुंबई, ठाणे यांसह राज्यभर बॅनरबाजी सुरू असतानाच, आता या मेळाव्याचा एक टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
टीझरमध्ये नेमकं काय आहे?
नुकतंच एक टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा हे वाक्य ठळकपणे ऐकायला मिळत आहे. या टीझरमध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणादरम्यानचे फोटो पाहायला मिळत आहे. त्यासोबतच यात आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला… वाजत गाजत गुलाल उधळत या…” असे नमूद करण्यात आले आहे.
आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा… ज्या ज्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साद घातलीय, त्या त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला, तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला… विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी… वाजत गाजत गुलाल उधळत या… ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई येथे ‘भव्य विजयी मेळावा’ होणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. नागपूरमधूनही विदर्भातील मनसैनिक मुंबईसाठी रवाना झाले आहेत. नागपूरमधील मनसेचे ४० ते ५० प्रमुख पदाधिकारी, ज्यात शहराध्यक्ष चंदू लाडे, जिल्हाप्रमुख आदित्य दुरुगकर, शहराध्यक्ष विशाल बडगे, दुर्गेश साकुलकर यांचा समावेश आहे, ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आगामी काळात ठाकरे बंधूंनी एकत्र राजकारण करण्याची मनसैनिकांची अपेक्षा असून, या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर किती प्रभाव टाकतो आणि ठाकरे बंधूंच्या एकजुटीला किती बळ देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
