
MNS Activist Resignation: मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजला आहे. येथे चौरंगी सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ठाकरे ब्रँडची महापालिका निवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षात जागा वाटपाचं ही गणित सुटलं आहे. दरम्यान काही प्रभागात इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही. काही ठिकाणी जागा एकमेकांसाठी सोडाव्या लागल्या. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे बंधु एकत्र आले आहेत, पण कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काय आहे अपडेट?
मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे
ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. पण कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. 11 वर्ष 9 महीने मनसे सोबत असलेल्या मनसे सैनिकांनी पक्षाची साथ सोडली आहे. वरिष्ठ या नाराजीवर काय तोडगा काढतात. त्यांची मनधरणी करतात का, याविषयीची चर्चा सुरू आहे.
चांदीवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
तर दुसरीकडे चांदीवलीत उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तीन शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे राजीनामे देण्यात आले आहेत.प्रभाग क्रमांक 161,159,157 इथल्या शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत.विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
प्रभाग क्रमांक 161 मध्ये पैशासाठी मराठी बहुल विभागात मागील वेळी एमआयएम मधून निवडणूक लढवलेला मुस्लिम उमेदवार देण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे. उमाकांत भांगिरे,प्रशांत नलगे,बाळकृष्ण गटे या शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे.
भाजपच्या डोक्याला ताप
तर दुसरीकडे वॉर्ड क्रमांक ६० मधून भाजपच्या बंडखोर उमेदवार दिव्या ढोले अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.वर्सोवातील वॉर्ड क्रमांक ६० मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे.भाजपकडून वॉर्ड क्रमांक ६० मधून सायली कुलकर्णी अधिकृत उमेदवार आहेत.जनतेच्या मागणीच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य लागते, असे म्हणत ढोले या उमेदवारीवर ठाम आहेत.
भाजपचे वॉर्ड १७३मधील नॉट रिचेबल बंडखोर नेते दत्ता केळूसकर यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर केळुसकर यांचा भावूक व्हिडिओ समोर आला आहे. “आता आर पार ची लढाई” म्हणत केळुसकर बंडखोरीवर ठाम आहेत. शिवसेनेच्या पुजा कांबळे प्रभाग १७३मधून अधिकृत उमेदवार आहेत. तर दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर भाजपच्या एबी फॉर्मवर अर्ज भरला आहे. तर भाजप केळुसकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.