
Uddhav-Raj Thackeray Mocked Eknath Shinde: मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. मराठी, हिंदी मुद्यावरून विकास कामाच्या श्रेयवादावरून आता दोन्ही बाजूंनी तुफान हल्लाबोल सुरू झाला आहे. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तेव्हा भाजपवर सडकून टीका केली. त्याचवेळी दोन्ही बंधुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. यावेळी राज ठाकरे यांच्या एकीच मारा पर सॉलिड मारा, या वक्तव्याची आठवण अनेकांना झाली. दोन्ही बाजूनी आता शब्दांना धार आल्याचे दिसून आले.
मराठी माणसांच्या हक्काविषयी बोलणार का?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपसह शिंदे सेनाला सवाल केला. १० वर्ष होऊन हिंदू खतरें में है म्हणणाऱ्यांना आधी विचारलं पाहिजे. बांगलादेशींची घुसखोरी होत आहे. त्याचं अपयश कुणाचं. मराठी माणसाचा अपमानन होत आहे. आहारावरून त्यांना हिणवलं जातंय. घर नाकारलं जातंय हे दोन वर्षात सुरू झालं आहे. पण हिंदू धोक्यात आलाय हा १० वर्षातील परिपाक आहे, असे चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदेसेनेला काढला.
महाराष्ट्राचा ममदानी होणार नाही हे कोण म्हणालं? चाटम? मला शब्द नीट ऐकायला आला नाही, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. ममदानी बद्दल मोदींना विचारावं. मोदी तिकडे केक खाऊन येतात. मुंबईवर बोला. त्यांच्या फालतू गोष्टींवर बोलायचं नाही, टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंना ठाकरेंचा हाबाडा
यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविषयीच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना हाबाडा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तो ठाण्यापण नाही, ढाण्या वाघ कुठे आहे? असा सणसणीत टोला लगावला. तर शिंदे हे ढाण्या वाघ असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याचा राज ठाकरे यांनीही खास समाचार घेतला. मी हसलो नाही…मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर आहे, असा खरमरीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाकयुद्ध अजून रंगणार असे चित्र आहे. यावेळी ठाकरे बंधुंनी भाजपवर तिखट हल्ला केला. तर पत्रकार परिषद संपल्यानंतर हिंदी माध्यमांनी राज ठाकरे यांना हिंदींत उत्तराची अपेक्षा केली असता हिंदी येत नसल्याच्या त्यांच्या उत्तराने सर्वांना हसू आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हिंदी-मराठी हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे अधोरेखित होते.