Uddhav Thackeray: तर हे मुंबईचे अदानीस्थान करतील… उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले
Uddhav Thackeray on Gautam Adani: मुंबई ही अदानींना आंदण दिल्याचा, उद्धव ठाकरे सातत्याने आरोप करत आले आहेत. आज मनसे, शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीचा संयुक्त वचननामा जाहीर करताना त्यांनी पुन्हा एकदा उद्योजक गौतम अदानी यांचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. काय केली त्यांनी टीका?

Uddhav Thackeray on Gautam Adani: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज रविवारी शिवसेना भवनात वचननामा जाहीर केला. शिवसेना,मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या शिवशक्ती वचननामा त्यांनी जाहीर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड फिरवला. तर उद्धव ठाकरे यांनी उद्योजक गौतम अदानी यांचा उल्लेख करत भाजपवर पुन्हा निशाणा साधला. त्यांनी मराठी, हिंदू महापौराच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले.
भाजपचा महापौर झाला तर मुंबईचं अदानीस्थान
कोरोना काळात उत्तर प्रदेशात प्रेतं वाहत होती. ती हिंदू होती की मुस्लिम हे फडणवीस यांनी सांगावं. त्यांना आमची कामे तर अडवू तर द्या. त्यांचं ढोंग बाहेर पडेल. मुख्यमंत्री असताना मराठी रंगभूमीचं दालन करणार होतो. त्यांनी रद्द केलं आणि बिल्डरच्या घशात घातलं. वरळी डेअरी जवळ कामगारांचं पुनर्वसन करून तिथे पर्यटन केंद्र करणार होतो.ते त्यांनी रद्द केलं. मराठी भाषा भवन, डंपिंग ग्राऊंडही रद्द केलं.असा आसूड उद्धव ठाकरे यांनी ओढला. त्याचवेळी भाजपचा महापौर झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल असा खळबळजनक दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.
आर्थिक केंद्र अहमदाबादला पळवलं
लाडक्या बहिणींप्रमाणेच उद्धव ठाकरे हे सुद्धा मुंबईत नवीन योजना राबवणार आहे. महिलांना कामही देणार आणि त्यांनी दीड हजार रुपयही देणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मनमोहन सिंग यांनी मुंबईत आर्थिक केंद्र केलं. त्यांचं मुंबईवर प्रेम होतं.पण भाजपचं सरकार आल्यावर त्यांनी ते उचलून गुजरातला दिलं, असा आरोप त्यांनी केला. तर मुंबईला नवीन आर्थिक केंद्र उभारणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोर्टात जाऊन काय होणार आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर. निवडणूक आयोगावर दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी. आरओ होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज सारखं डीलिट केलं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. तीन लाख कोटींचा घोटाळा या खोकासुरांनी केला आहे. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही. आम्ही मराठी आहोत. हिंदूच आहोत. संयुक्त महाराष्ट्रापासून लढा दिला गेला. तेव्हा भाजप आणि जनसंघ कुठे होता. ते कधी मराठी माणूस आणि हिंदूंच्या बाजूने उभे राहिले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला. तर सर्वच मुद्दे याच पत्रकार परिषदेत विचारणार का, असे राज ठाकरे म्हणाले.
