ऐन पावसाळ्यात वसई- विरारकरांचे तोंडचे पाणी पळणार ?,का ते वाचा ?
वसई आणि विरार परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तिष्ठत रहावे लागत असताना यंदाच्या पावसाळ्याने तोंडचे पाणी पळाले आहे. या भागातील नागरिकांच्या समस्यांना कोणी वालीच राहीला नसल्याचे उघड झाले आहे.

पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक जलस्रोत पावसाने भरले असून एकीकडे पाणी कपातीचे संकट टळले असताना वसई- विरारकरांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे. वसई- विरार महानगर पालिकेतील रहिवाशांना येते काही दिवस पाणी जपून वापरण्याच्या सूचना संबंधित महानगर पालिकांनी दिल्या आहेत.
वसई-विरार शहर महानगरपालिकेला सुर्या टप्पा-१ आणि ३ या योजनेतुन २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सुर्या पाणी योजनेतून ४०३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेतून १५० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होत असते. मात्र, वादळी पावसाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी MSEDCL मार्फत पुरवण्यात येणाऱ्या वीजेत खंड पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
MMRDA च्या पाणी पुरवठा योजनेतील कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्या नगर जलशुद्धीकरण केंद्र (कासा विक्रमगड) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी MSEDCL मार्फत विज पुरवठा होत आहे. या भागात दि.१३ जूनपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने या ठिकाणी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्यापडून योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
सुर्या योजनेतील मासवण आणि धुकटण येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत होणारा वीजपुरवठा दि. १३ जून रोजी पासून वारंवार खंडीत होत आहे.या स्थितीत १६ जून रोजी सकाळी ८.०० वा. पासून MMRDA च्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.त्यामुळे वसई-विरार शहरास होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात तसेच कमी दाबाने होत आहे.
कमी दाबाने पाणी पुरवठा
या कारणामुळे पुढील ३ ते ४ दिवस महापालिका क्षेत्रास होणारा पाणी पुरवठा हा अपुऱ्या आणि कमी दाबाने होणार असून नागरीकांनी उपलब्ध पाणी जपुन वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती महानगर पालिकेने केली आहे.