नाना पाटेकर की कॅप्टन स्मित मच्छार? जोडपुलाच्या नामकरणावरून मुंबईत राजकारण तापलं, महापौरांकडून भूमिका स्पष्ट
Vidyavihar East-West Flyover News: विद्याविहार जोडपुलाच्या नामकरणावरून राजकारण तापणार आहे. मुंबईत नवा वाद सुरू झाला आहे. यावर महापौरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडपूल तयार होऊन सज्ज झाला आहे. तरी त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. मात्र उद्घाटनापूर्वीच या पुलाच्या नामकरणावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने या पुलाला कॅप्टन स्मित मच्छार उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी केली आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने ज्येष्ठ अभिनेते आणि समाजसेवक दिवंगत नाना पाटेकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या पुलाचे नामकरण नेमके कुणाच्या नावाने होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. यावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार पराग शहा यांनी विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडपुलाला कॅप्टन स्मित मच्छार उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक प्रकाश वाणी यांनी या पुलाला दिवंगत नाना पाटेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली.
त्यामुळे पुलाच्या नामकरणावरून भाजप आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वादावर महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुलाच्या नामकरणाचे राजकारण कुणीही करू नये. या पुलाला कोणाचे नाव द्यायचे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण एकत्र बसून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या विषयाचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पुलाच्या उद्घाटनाबाबत बोलताना तावडे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर होते. त्यामुळे पुलाच्या उद्घाटनासाठी आणखी दोन दिवस लागतील. पूल तयार असून लवकरच त्याचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तावडे यांनी मुंबईतील पाणीस्थिती आणि पोलिसांच्या घरांचाही उल्लेख केला. मुंबईत सुमारे १० टक्के पाणीकपात असून दुष्काळाचे सावट आहे. धरणांची पाहणी करण्यात आली आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईकरांना पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्या म्हणाल्या.
तसेच पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपणही आग्रही आहोत. लवकरच पोलिसांच्या घरांची पाहणी केली जाईल. पोलिसांसाठी नवीन घरे बांधून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले. आता विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडपुलाच्या उद्घाटनाची तारीख आणि नामकरणाचा अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्घाटनापूर्वीच सुरू झालेल्या या नामकरणाच्या वादामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
