विजय वडेट्टीवार यांची सर्वात मोठी मागणी, दोन मुद्द्यांवर सरकारला घेरलं
ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर सरकार छाती बडवतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, दूध का दूध पानी का पानी होईल, हिंमत असेल तर घ्या निवडणुका हे माझं आव्हान आहे, असं आव्हानच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलं. तसेच धरणात पाणी नाही, राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सत्तेतील आमदारांनी आपले तालुके टंचाईग्रस्त केलेस आहेत. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासही त्यांनी विरोध केला आहे. भुजबळांच्या या मागणीचं ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनीही भुजबळ यांच्या मुद्द्यांशी सहमती दर्शवली आहे. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेतली आहे. वडेट्टीवार यांनीही मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला आहे. वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला दोन मुद्द्यांवर घेरलं आहे.
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण मराठ्यांना आरक्षणाची टक्केवारी वाढवून आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास आमचा आधीही विरोध होता, आताही आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ओबीसीतील अनेक जातींची अवस्था वाईट आहे. त्यांना काहीच मिळालं नाही. इथे बळी तो कानपिळी आहे. त्यामुळे ओबीसीतील असलेल्या घटकांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाही. म्हणूनच आमच्या आरक्षणात कोणी वाटेकरी नकोय, असं ते म्हणाले.
आमच्याही जाती शोधा
कुणबी नोंदणी शोधण्याचं काम शिंदे समितीला दिलं आहे. कुणबींच्या नोंदणी शोधत असताना ओबीसींच्या सर्वजाती शोधाव्यात आणि श्वेतपत्रिका काढली जावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार यांनी या दोन मागण्यांवर अधिक जोर देऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींना ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 67 पुरावे मागितले जात आहे. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. म्हणूनच ओबीसींच्या नोंदणी शोधल्या पाहिजे. त्यामुळे ओबीसींनाही आरक्षण मिळणं सोपं जाईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
भुजबळांच्या मागे उभं राहणार
आमच्यातीलही जाती सोधा म्हणजे प्रमाणपत्रासाठी लागणारा आमचाही त्रास कमी होईल. आम्हालाही उतारे शोधताना त्रास होतो. प्रमाणपत्रासाठी त्रास होतो, तो कमी होईल. जो समाज हक्कासाठी भांडतो त्यांच्यासोबत उभं राहणं भाग आहे. त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी भुजबळांसोबत राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे बुडण्याच्या मार्गावर
सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाहीये. समुद्राला भरती आहे की ओहोटी हे त्यांना माहीत नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची नवीन मागणी समोर आली आहे. सरकारवर कॅप्टनचं नियंत्रण राहिलं नाही. हे बुडण्याच्या मार्गावर आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
