सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा, चंद्रकांत पाटलांचं फर्मान; भाजप पंकजा मुंडेंच्या मार्गावर?

सरकार कधी येणार... देवेंद्रजी, आमच्या कानात सांगा... आम्ही कुणाला सांगणार नाही... या चर्चा आता बंद करा. प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आपण ठरवलं असून आपण जूनपासून कामही सुरू केलं आहे.

सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा, चंद्रकांत पाटलांचं फर्मान; भाजप पंकजा मुंडेंच्या मार्गावर?
chandrakant patil

मुंबई: सरकार कधी येणार… देवेंद्रजी, आमच्या कानात सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… या चर्चा आता बंद करा. प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आपण ठरवलं असून आपण जूनपासून कामही सुरू केलं आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. त्यामुळे भाजपने सरकार पाडण्याचा नाद सोडला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपच्या दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावले. आपल्याला प्रखर विरोधी पक्षनेते बनायचं आहे. जूनपासून आपण काम करत आहोत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कामही सुरू केलं असून वेळोवेळी तुम्हाला कार्यक्रमही दिले आहेत, असं पाटील म्हणाले.

प्लानिंग केलं अन् पुतळे जाळले

कालपरवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण दिला. आदल्या दिवशी 9 वाजता एका व्हिडीओ कॉलवर आपण हा कार्यक्रम दिला. दुसऱ्या दिवशी 26-27 मोठ्या शहरात आपण नवाब मलिकांचे पुतळे जाळले. मलिकांचा पुतळा जाळला गेला नाही, अटक केली नाही असं झालं नाही. इतकं कमी वेळात प्लानिंग झालं, असं त्यांनी सांगितलं. तसेच, इंधनावरील व्हॅट कमी करावा म्हणून आपण कार्यक्रम दिला. 400 हून अधिक जिल्हा केंद्र आणि तहसील केंद्रांवर निदर्शने करण्यात आली. निवेदने देण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं.

एसटीचं नेतृत्व भाजपकडे आलं

जूननंतर सेवा हेच संघटन यावरच आपण काम केलं. प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपण खूप कामं केली. एसटीच्या आंदोलनात सर्व एसटी कामगारांच्या संघटना बरखास्त झाल्या. त्याचं नेतृत्व भाजपकडे आलं. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे आपले दोन नेते एसटी कामगारांच्या आंदोलनात आहेत. गोपीचंदला पाठवा, सदाभाऊंना पाठवा… अशी गावागावातून एसटी कर्मचाऱ्यांकडून डिमांड होत आहे. त्यांच्या कुठल्याही युनियन लिडरचं नाव कर्मचारी घेत नाहीत. कारण त्यांना सर्वांनी फसवलं आहे, असं ते म्हणाले.

ठोक के जिंकलो

आपल्या पक्षाचा एक अतिशय शास्त्रीय क्रम ठरला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते. त्यानंतर सात दिवसाने राज्याची बैठक होते. या बैठकीनंतर सात दिवसानंतर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या पाहिजे. पंढरपूरची विधानसभा आपण जिंकली. अमित शहांच्या भाषेत सांगायाचं म्हणजे आपण ठोकके विजयी मिळविला. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह होता. त्याचवेळी 15 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात 10 हजार पंचायत समित्यांमध्ये आपले सरपंच झाले, असंही त्यांनी सांगितलं.

अरे तनपुरे सुटला… त्याचं नाव घे

मोदींच्या राजकीय जीवनाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आपण कार्यक्रम दिले. ते राबवले गेले, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी सडकून टीका केली. आज जो जो समाजात क्राईम मानला जातो. तो यांच्या मंत्री किंवा आमदारांच्या नावावर आहे. चोरी ते बलात्कार आणि भ्रष्टाचार हे सर्व गुन्हे तुमच्या कोणत्या ना कोणत्या आमदार आणि मंत्र्याशी जोडले गेले आहेत. राज्यातील गुन्हेगारीकरणावर आशिष शेलारांनी ठराव दिला आहे. हा ठराव तयार करताना गुन्ह्यांची यादी तयार केली जात होती. तेव्हा मी एकाला म्हटलं, अरे प्रसाद तनपुरे सुटला… त्यांच्यावर पत्रकाराला आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त केल्याचा आरोप आहे. त्यांचं नाव घे, असं मी सांगितलं. त्यावर, साहेब, एवढ्या मंत्री, आमदारांवर गुन्हे आहेत की नावं विसरली जातात, असं आपला कर्मचारी म्हणाला. म्हणजे बघा इतकी भयावह परिस्थिती आहे, असंही ते म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात समर्थकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना आरसा दाखवला होता. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी स्वपक्षीयांना दिला होता. पंकजा यांची हीच भूमिका आज पाटील यांनी मांडल्याने भाजपही पंकजा यांच्या मार्गावर चाललाय का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

 

संबंधित बातम्या:

राजकीय जीवनात अनेक धमक्या आल्या, पण त्याचा परिणाम नाही, गडचिरोलीतील तरुणांसाठी काम करणार: एकनाथ शिंदे

काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI