त्यांना मतदान करूच नका, महापालिका निवडणुकीच्या 2 दिवस आधी जरांगे पाटलांचे पत्ते ओपन, थेट भूमिकेमुळे मोठी खळबळ
महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यापूर्वी मोठी बातमी समोर येत असून, आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट आपली भूमिका जाहीर केली आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या 15 तारखेला राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी मराठा समाजातील बांधवांना मोठं आवाहान केलं आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. जे समाजाच्या विरोधात गेले होते, जे आरक्षणाच्या विरोधात गेले, नेमके तेच आता निवडणुकीत उभे आहेत. त्यांना मतदान करू नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागलं पाहिजे . मुस्लिम दलितांची या सरकारने काडी लावून टाकली. या सरकारचा कार्यक्रम करा. इतकी खुन्नस ठेवायची की यांना मतदान करायचं नाही. आम्ही कसं लोकसभेला एवढा फेस काढला होता. निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर यांनी पैसे वाटलेच आहेत. खूप माल आहे यांच्याकडे. यांच्याकडे आधी काय होतं? आता खूप पैशांचे बंडलं आहेत वाटतं. शर्टामधून दिसतील असे बंडल हे सोबत ठेवतात. नोटा वाटतात आणि घोळ करतात. या महापालिकेत कोणासोबत कोणाची युती हेच कळत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
यांचं राष्ट्रवादीसोबत जमतं, भाजप शिवसेनेसोबत जमतं, काँग्रेससोबतही युती आहे. हे सर्व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र आले आहेत. म्हणजे याचे शत्रू कोण तर आम्हीच ना, गोरगरीब जनता? आपल्या पक्षाचा नेता निवडून आला पाहिजे मग युती कुणासोबतही करा असा या लोकांचा अजेंडा आहे. लोक येडे आहेत, यांना पर्याय नाहीत. लोकांना एखादा पर्याय मिळू द्या, मग बघा जनता यांना कसं उलटंपालटं करते असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका अशा स्थानिक लेव्हलच्या निवडणुकीत मी पडतच नाही, आपल्याला असा टप्पू मासा लागतो, त्याला जर माज असेल तर तो माज मी उतरवलाच म्हणून समजा असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
