पहिल्यांदाच असं घडलं? नागपूरच्या आज्जीचं हृदय डाव्या बाजूला नव्हतंच… हार्ट अटॅक आला आणि जे समजलं त्याने… आज्जीचं हृदय होतं कुठे?
नागपूरच्या सावनेर येथील एका ७० वर्षीय आजींचे हृदय डाव्या ऐवजी उजव्या बाजूला असल्याचे ७० वर्षांनंतर समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या दुर्मिळ 'डेक्स्ट्रोकार्डिया' शस्त्रक्रियेमुळे आजींना जीवदान मिळाले असून वैद्यकीय क्षेत्रात याची मोठी चर्चा होत आहे.

मानवी शरीराची रचना ही निसर्गाचा एक चमत्कार आहे. सर्वसाधारणपणे माणसाचे हृदय हे छातीच्या डाव्या बाजूला असते, हे विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान आपल्याला आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका ७० वर्षीय आजींच्या बाबतीत निसर्गाचा एक असा चमत्कार समोर आला आहे. ज्यामुळे स्वत: डॉक्टरही थक्क झाले आहेत. या आजींचे हृदय डाव्या बाजूला नसून चक्क उजव्या बाजूला आहे. हे वास्तव तब्बल सात दशकांनंतर एका हृदयविकाराच्या धक्क्यामुळे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
सावनेर येथील रहिवासी असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला अचानक छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने तपासणी सुरू झाली. सुरुवातीला ही केस नेहमीच्या हृदयविकारासारखीच वाटत होती. मात्र ईसीजी (ECG) आणि इको (ECHO) चाचण्यांदरम्यान काहीतरी वेगळे असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर जेव्हा आजींची इको तपासणी करत होते. तेव्हा त्यांना हृदय नेहमीच्या जागी डाव्या बाजूला दिसले नाही. अधिक सखोल तपासणी केली असता आजींना ‘डेक्स्ट्रोकार्डिया’ (Dextrocardia) ही जन्मजात अवस्था असल्याचे निदान झाले. यामध्ये व्यक्तीचे हृदय जन्मापासूनच उजव्या बाजूला असते. जागतिक स्तरावर अशा केसेस अत्यंत दुर्मिळ आहेत. ७० व्या वर्षी याचे निदान होणे ही वैद्यकीय क्षेत्रातील मोठी घटना मानली जात आहे.
आव्हानात्मक शस्त्रक्रिया आणि यश
केवळ हृदय उजव्या बाजूला असणे हेच एकमेव आव्हान नव्हते, तर आजींच्या हृदयाची मुख्य रक्तवाहिनी (LAD) ९० टक्के बंद झाली होती. हृदयाची रचना उलट असल्याने सर्व रक्तवाहिन्यांची दिशाही विरुद्ध होती. अशा परिस्थितीत अँजिओप्लास्टी करणे अत्यंत जटिल आणि जोखमीचे होते. मात्र, डॉ. हितेंद्र भागवतकर आणि त्यांच्या अनुभवी टीमने हे आव्हान स्वीकारले. उजव्या बाजूच्या हृदयात यशस्वीरित्या स्टेंट टाकून रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला.
डॉक्टरांच्या या कौशल्यामुळे ७० वर्षीय आजींना अक्षरशः पुनर्जन्म मिळाला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या यशाबद्दल आमदार डॉ. आशिष देशमुख, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी टीमचे अभिनंदन केले आहे. याबद्दल नागपूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इको तपासणी करताना हृदय नेहमीच्या जागी नव्हते, तेव्हाच आम्हाला शंका आली. तपासणीअंती ते उजव्या बाजूला असल्याचे स्पष्ट झाले. अशा दुर्मिळ स्थितीत अँजिओप्लास्टी करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते, पण आम्ही यशस्वी झालो, असे डॉ. हितेंद्र भागवतकर म्हणाले.
