विदर्भात मुसळधार पावसाचा हाहा:कार, रस्ते बंद, शाळांना सुट्टी; प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती काय?
नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. नागपूरमध्ये १७२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला संततधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. रविवार रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अजिबात थांबलेला नाही, ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातही पूरस्थिती गंभीर बनली असून गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या ६० तासांत सुमारे १७२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच पूल वाहून गेले आहेत. त्यासोबतच जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विदर्भातील मुसळधार पावसामुळे सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतला.
नागपुरात विक्रमी पाऊस
नागपूर शहरात गेल्या ६० तासांहून अधिक काळ संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नेत्र विभाग पाण्याखाली गेला आहे. नरसाळा भागात पोहरा नदीने रौद्ररूप धारण केल्याने अनेक घरांमध्ये नागरिक अडकले आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून बोटींच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. अजूनही १० ते १२ लोक घरात अडकले असण्याची शक्यता आहे.
विदर्भातील ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर आहे. कान्होलिबारा-हिंगणा राज्य महामार्गावरील पिपळधरा येथील पूल वाहून गेला आहे. ज्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. कुही-नागपूर मार्गावरील माळणी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. तसेच, आम नदी पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. आम नदीने रुद्र रूप धारण केले आहे. धापेवाडा-पाटणसावंगी राज्य मार्गावरील चंद्रभागा आणि कोलार नद्यांच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) सज्ज असल्याचे सांगितले आहे. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गडचिरोलीत राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले आहे. गोसीखुर्द धरणातून सुमारे १२,००० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल आणि कठानी या पाच नद्यांना पूर आला आहे. याचा थेट परिणाम म्हणून गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्ग पाल नदीच्या पुरामुळे पूर्णपणे बंद पडला आहे. या महामार्गावर १५ ते २० फूट पाणी साचले आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह १९ राज्य महामार्ग आणि दुर्गम भागातील रस्ते बंद झाले आहेत. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
गडचिरोलीत नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजीपाला, दूध, पेट्रोल, डिझेल आणि मालवाहतूक करणारी वाहने नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अडकून पडली आहेत. स्थानिक नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. तसेच गोसीखुर्द धरणातून पाण्याचे नियोजनबद्ध विसर्ग करण्याची, तसेच राज्य आणि केंद्र सरकारने जिल्ह्यातील पुलांची उंची वाढवून पूर परिस्थितीतून गडचिरोलीकरांची मुक्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अमरावतीत घरांची भिंत कोसळली
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घराची भिंत मध्यरात्री कोसळली. मुक्ताबाई मरसकोल्हे असे या महिलेचे नाव असून, मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास त्या झोपेत असताना ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे वृद्ध महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य पावसाच्या पाण्याने भिजले आहे. तात्काळ मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चंद्रपूर: वैनगंगा दुथडी भरून, वाहतूक ठप्प
चंद्रपूर जिल्ह्यातही वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. वैनगंगा दुथडी भरून वाहत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम ब्रह्मपुरीमध्ये दाखल झाली आहे. तसेच पिंपळगाव-भोसले गावात वैनगंगा नदीचे पाणी शिरले आहे. त्यासोबतच भूती नाल्यावरील लहान पूल वाहून गेल्याने ब्रह्मपुरी-अर्हेर नवरगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ज्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
गोंदियात अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचे मोठे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणी नाल्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांनी शेतात केलेली रोवणीही पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिस्थितीचा अंदाज घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वर्ध्यात रात्रभर पाऊस, शाळांना सुट्टी
वर्धा जिल्ह्यातही रात्रभर संततधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग सेंटर्सला सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यशोदा नदीच्या पुरामुळे सरूळ येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. लाल नाला प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाच्या दोन दरवाजातून ९.३८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
