मनसे महायुतीत आहे का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले….
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजप-मनसे युतीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना राज ठाकरे यांना मित्र म्हटले. पण मनसेने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने सध्या युतीचा प्रश्नच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तरीही फडणवीस यांनी काही जागांवर सहकार्याची शक्यता नाकारली नाही.
मनसेकडून राज्यातील 100 पेक्षा जास्त जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार आहेत. दुसरीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीनंतर मनसे आणि भाजप यांची महायुती असेल, असं म्हटलं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील तसंच वक्तव्य केलं आहे. “आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत सत्तेत असेल. या निवडणुकीनंतर मनसे सत्तेत आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल, तर 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेचा मुख्यमंत्री असेल”, असं भाकीत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे ठाकरे पिता-पुत्रांकडून असं वक्तव्य केलं जात आहे. दुसरीकडे मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधातही उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपचं याबाबत मत काय आहे? भाजप मनसेला महायुतीचा भाग समजतं का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी आज केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये आज याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
“राज ठाकरे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी यंदा महायुतीच्या विरोधात देखील उमेदवार उभे केले आहेत. महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसोबत रिपाई मित्रपक्ष लढत आहेत. राज ठाकरे यांनी अनेक उमेदवार उभे केले असल्यामुळे सध्या तरी मनसे आणि भाजपच्या युतीचा स्कोप नाही. त्यांचे उमेदवार ते मागे घेणार नसल्यामुळे आम्ही समोरासमोर लढत आहोत”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
‘मनसेसोबत एखाद-दोन जागी…’
“महायुती असो, महाविकास आघाडी आणि मनसे, इतर पक्ष आघाड्यांसोबत स्वतंत्रपणे लढत आहेत. मनसेसोबत एखाद-दोन जागी मुख्यमंत्र्याच्या मान्यतेने अलायन्स म्हणून मदत करू शकतो, उदाहरणार्थ शिवडीच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. आताच्या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारचे मुख्यमंत्री प्रमुख आहेत. सरकारमध्ये मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात काम करत आहोत”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेवर काय म्हणाले?
दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यावर भुमिका मांडली. “दिवसातून तीन वेळा माझं नाव घेतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने 1982 पासून मराठा आरक्षण अडवून ठेवलं त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.