माजी महापौर अटल बहाद्दूर सिंग यांचे निधन, नागपूर मनपातील किंगमेकर हरवला

एकेकाळी सिंग यांनी महापालिकेत किंग मेकरची भूमिका बजावली होती. दिलेला शब्द पाळणारा आणि जातिधर्माच्या पलीकडे विचार करणारा, अशी अटल बहाद्दूर सिंग यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.

माजी महापौर अटल बहाद्दूर सिंग यांचे निधन, नागपूर मनपातील किंगमेकर हरवला


नागपूर : नागपूरचे माजी महापौर अटल बहाद्दूर सिंग यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अटल बहाद्दूर सिंग हे 1977 व 1994 असे दोन वेळा नागपूरचे महापौर होते. अटल बहाद्दूर सिंग हे ज्येष्ठ क्रीडा प्रशासकही होते. फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्षही होते. लोकमंच समूहाची स्थापना त्यांनी केली होती.

एकेकाळी सिंग यांनी महापालिकेत किंग मेकरची भूमिका बजावली होती. दिलेला शब्द पाळणारा आणि जातिधर्माच्या पलीकडे विचार करणारा, अशी अटल बहाद्दूर सिंग यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे.

भाजपला ठोकला होता रामराम

2004 च्या निवडणुकीत त्यांना नागपूर-कामठी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. तत्कालीन काँग्रेसचे केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याकडून अटल बहाद्दूर सिंग यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. एक फेब्रुवारी 2006 च्या नागपूर मनपा निवडणुकीत त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता.

सलग 21 वर्षे होते सिनेट सदस्य

विद्यापीठात एकही शिख मतदार नव्हता. तरीही अटल बहाद्दूर सिंग हे सलग 21 वर्षे सिनेट सदस्य म्हणून निवडून आले. नागपूरकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिले होते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

मनपात किंगमेकरची भूमिका

तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून भाजप सोडल्याचं अटल बहाद्दूर सिंग यांनी सांगितलं होतं. भाजपात येऊन चूक केल्याचं ते त्यावेळी म्हणाले होते. तसेच लोकमंच या अटल बहाद्दूर सिंग यांच्या नेतृत्वातील समूहानं राष्ट्रीय जनता दलासोबत नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाग घेतला होता. 1998 च्या नागपूर मनपा निवडणुकीत लोकमंच आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्यानं शहरातील पहिली महिला महापौर निवडली गेली होती. कुंदा विजयकर या त्या पहिल्या महिला महापौर होत्या. त्यावेळी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. अशावेळी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मदत घेतली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे यांचा गट सक्रिय होता. महापौर निवडीसाठी तत्कालीन नेते शरद पवार, रा. सु. गवई यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला होता.

विदर्भातील कोरोनाचे रुग्ण कमी, 11 जिल्ह्यात सापडले 10 रुग्ण, बरे होण्याचं प्रमाण जास्त

एकाच जागी वीज प्रकल्प नकोत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, शरद पवार यांचे मत

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI