Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं, फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात बैठक, तोडगा निघणार?
Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule Meeting: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबई मोर्चावर ठाम आहेत. अगदी थोड्याच वेळात आंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक होत आहे. त्याअगोदर नागपूरमध्ये मोठी घडामोड घडली आहे.

गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: आंतरवाली सराटीत मराठा समाजाची थोड्याच वेळात राज्यव्यापी बैठक होत आहे. मनोज जरांगे यांनी अगोदरच मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड घडली आहे. जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक सुरू झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जात आहे. त्यापूर्वीच नागपूरमधील रामगिरी या बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात बैठक सुरू झाली. या बैठकीत जरांगे पाटील यांची मागणी आणि भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी आंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांसोबत जरांगे पाटील यांची राज्यव्यापी बैठक होत आहे. त्यापूर्वीच नागपूरमध्ये खलबतं झाली. या बैठकीत काय घडतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कालपासून मुख्यमंत्री हे नागपूरमध्ये मुक्कामी आहेत. थोड्याच वेळात ते दिल्लीकडे रवाना होतील. त्यापूर्वीची ही भेट आणि बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या अर्धा तासापासून ही बैठक सुरू आहे.
आजच्या बैठकीतून जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दुपारी बारा वाजता मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक पार पडते आहे,मराठा समाज बांधवांशी चर्चा करून आज मुंबई आंदोलनाची दिशा ठरणार असल्याने वेगवेगळ्या भागातून मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने दाखल होतोय, आजच्या बैठकीतून मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल अशा प्रतिक्रिया अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा समाज बांधवांनी दिल्या. शिवाय यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा देखील पक्का निर्धार समाज बांधवांनी केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान शासनाने फसवणूक केली म्हणून तिसऱ्यांदा मुंबईला जाण्याची वेळ आल्याची ही खंत समाजबांधव व्यक्त करताना दिसले.
