भाजप सोडा, पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना कुणी दिली ऑफर? महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार?
पंकजा मुंडेंच्या निवृत्तीच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने त्यांना भाजप सोडून मुख्यमंत्रीपदाची थेट ऑफर दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी, पंकजा मुंडेंनी काँग्रेसमध्ये येऊन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावे, असे आवाहन केले आहे.

भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी रिटायर व्हावसं वाटतं, असं विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांच्यया विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. काँग्रेस तर पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली आहे. त्यावर पंकजा मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, काँग्रेसने राजकीय वर्तुळात उलथापालथ करणारं विधान केल्याने या ऑफरची चर्चा रंगली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांना ही थेट ऑफर दिली आहे. ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम मुंडे साहेब गेल्यानंतर सुरू झाले. पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नाही, असे वाटत असेल, त्यामुळे त्या भावना उफाळून येतात. पंकजा मुंडे यांना आमची विनंती राहील की, तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्त्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. भाजमधून बाहेर पडा. मैदानात या. आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊ. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येत असतील तर नेतृत्वाला विचारून नक्की निर्णय घेऊ, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
जातीनिहाय जनगणना करापंक
आजपासून विदर्भातील 11 जिल्ह्यात मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे. 11 जिल्ह्यात प्रवास करून या यात्रेचा समारोप होणार आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी ही यात्रेतील प्रमुख मागणी आहे. सोबतच स्वतंत्र ओबीसी मंत्रालय निर्माण करावे, अशी सुद्धा मागणी असणार आहे. आमच्या लोकसंख्येनुसार 1 हजार कोटी महज्योतीला मिळावे तरच ओबीसींचं कल्याण होईल. ओबीसी 1 लाख पदाचा बॅकलॉग त्वरित भरण्यात यावा. ओबीसी समाजाला लोकसंखेप्रमाणे बजेटमध्ये तरतूद व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
उद्योजकांना खूश करायचे आहे का?
शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. त्यावरही त्यांनी संताप व्यक्त केला. समृद्धीवर आता लोक गाडी चालवायला घाबरतात. या रस्त्याची कशी वाट लागली माहीत नाही. मोठ्या कंत्राटदाराला फायदा मिळविण्यासाठी कोट्यवधीची कामे देऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. जमिनीचे दर लाखो रुपयात गेले असताना कमी दरात पोलीस लावून गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात जमीन मोजण्याची बळजबरी सुरू आहे. ही सगळी हाव सरकारला टक्केवारी वसूल करण्यासाठी आहे की उद्योजकांना खुश करण्यासाठी आहे? असा संताप त्यांनी व्यक्त केला.
म्हणून तसे बॅनर लागले
छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री बनवा, अशी मागणी करणारे बॅनर्स नाशिकमध्ये लागले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिक येथील कुंभमेळाव्यासाठी सगळे गुजरात, उत्तर प्रदेशातील कंत्राटदार आणले. पहिल्या पाण्यात सगळी काम वाहून गेली. कोणत्याही अटीशर्ती न देता त्यांनाच कंत्राट मिळतात. त्यांनी 30 टक्के मार्जीन काढली आहे. लोक शिव्या घालत आहेत. बोगस कंत्राटदाराकडून लुटू सुरु असल्याने जनतेचा उद्रेक झाला असेल म्हणून तसे बॅनर लागले असतील, असा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाल्या होत्या पंकजा?
परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केले होते. या रस्त्यावर खडकत-खडकत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला नव्याने प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी म्हटले. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमचा विकास करण्यासाठी आहे, असे म्हणत त्यांनी विकासाची ग्वाही दिली. पंकजा मुंडे यांनी अचानक केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
काँग्रेसची ओबीसींवर नजर?
पंकजा मुंडे या भाजपमधील ओबीसीच्या बड्या नेत्या आहेत. त्यांची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. गोपिनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग पंकजा यांच्या शब्दाच्या पलिकडे जात नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासारखी मातब्बर महिला नेत्या काँग्रेसमध्ये आल्यास काँग्रेसला राज्यात बळ मिळेल. शिवाय मोठा ओबीसी वर्ग काँग्रेसकडे येऊ शकतो. राज्यात ओबीसींची मोट बांधण्यासाठीच वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचं सांगितलं जात आहे.
