मुलानंतर वडीलही अडचणीत? उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होणार; शंभुराज देसाई यांची घोषणा
राणा यांच्या या मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांनी गंभीर दखल घेतली. हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. ते सांगतात त्या प्रमाणे त्यांनी एनआयए आणि अमित शहांकडे तक्रार केली होती.

नागपूर: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे कालच राज्य सरकारने आदेश दिले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असल्याने आदित्य यांच्या अडचणी वाढल्याचे सांगण्यात येत असतानाच आज उद्धव ठाकरे यांची अडचण वाढवणारी बातमी समोर आली आहे. उमेश कोल्हे प्रकरणी तपास करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन केले होते. या फोनची आता गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. आमदार रवी राणा यांच्या मागणीनंतर राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुलापाठोपाठ आता वडिलांचीही अडचण वाढणार असल्याचं समोर येत आहे.
उमेश कोल्हे हत्येप्रकरणा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. आमदार रवी राणा यांनी हे प्रकरण विधानसभेत चांगलंच लावून धरलं. एनआयएने या प्रकरणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. त्यात अमोल कोल्हे यांची हत्या झाल्याचं म्हटलं आहे.
नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचं या आरोपपत्रात म्हटलं असून या प्रकरणी 11 ते 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, असं रवी राणा यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारने एक महिना या प्रकरणाचा तपास रॉबरीच्या दिशेने केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा तपास रॉबरीच्या दिशेने करण्यात आला. त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून तसे आदेश दिले होते.
तो रॉबरीच्या दिशेने का केला? या तपासाला वेगळी दिशा का देण्यात आली? राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण दाबत असल्याने त्याची एनआयए मार्फत चौकशी करावी लागली. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली.
आदित्य ठाकरे यांना सांगण आहे की, हे सरकार हिंदू विचारांचं आहे. काँग्रेसच्या सांगण्याने जमणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या फोनची चौकशी झाली पाहिजे, असंही राणा म्हणाले.
राणा यांच्या या मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांनी गंभीर दखल घेतली. हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. ते सांगतात त्या प्रमाणे त्यांनी एनआयए आणि अमित शहांकडे तक्रार केली होती. एनआयने या प्रकरणाची चौकशी केली. चार्जशीट दाखल केली. मग आपले पोलीस काय करत होते? असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला.
हा तपास डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिशेने तपास व्हायचा होता तो झाला नाही. त्यामुळे राज्य गुप्तचर आयुक्तांना या सर्व गोष्टी कळवल्या जातील. तुम्ही तुमचे मुद्दे द्या. त्यावर 15 दिवसाच्या आत गुप्तचर आयुक्तांचा अहवाल मागवला जाईल. या प्रकरणात कुणाचा फोन आला का? हे सर्व रेकॉर्ड तपासले जाईल. अहवाल आल्यावर तो मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले.
