कारगिल पोलीस अचानक थेट नागपुरात, सुनीता जामगडे प्रकरणात नवा ट्विस्ट काय?
सुनीता जामगडे यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारगिल पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात येऊन न्यायालयीन परवानगी नसल्यामुळे परतले. आता ते न्यायालयाकडून परवानगी घेऊन पुन्हा येण्याची शक्यता आहे. सुनीता नागपूर कारागृहात आहे आणि तिचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.

भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सुनीता जामगडेला अटक करण्यासाठी कारगिल पोलीस थेट नागपुरात आले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनीताला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते. पण न्यायालयीन परवानगी घेतली नसल्याने कारगिल पोलिसांना सुनीताचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे कारगिल पोलीस पुन्हा एकदा कोर्टाची परवानगी घेऊन सुनीताला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या सुनिता जामगडेला प्रोडक्शन वॉरंटवर न घेताच कारगिल पोलीस परतले आहेत. सुनीता जामगडे सध्या नागपूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कारगिल पोलिसांनी सुनीतावर कारगिलमधील विशेष अॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचा तपास करण्याकरिता कारगिल पोलिसांना सुनिता प्रोडक्शन वॉरंटवर हवी असून तिला कारगिलमध्ये नेऊन रिक्रिएशन आणि तपास करायचा होता.
सुनीताचा मुक्काम वाढणार
कारगिल पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली न्यायालयीन परवानगी आणली नव्हती. त्यामुळे कारगिल पोलीस नागपूर न्यायालयात गेले. पण नागपूर न्यायालयातून त्यांना प्रोडक्शन वॉरंट मिळू शकला नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात कारगिलमधील स्थानिक न्यायालयाचा वॉरंट घेऊन कारगिल पोलीस नागपूरच्या न्यायालयात पुन्हा एकदा अपील करणार असल्याची माहिती आहे. यामुळे आता सुनीताचा नागपूर कारागृहातील मुक्काम आता वाढणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
काय घडलं?
दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मे रोजी नागपूरहून 13 वर्षीय मुलासोबत सुनीताने पाकला जाण्याचा निर्णय घेताल होता. 14 मे रोजी ती लडाखहून कारगिल येथील हुंदरमन गावाहून पाकिस्तानात गेली. सुनीताने मुलाला हॉटेलात सोडून सीमा पार केल्याचं सांगितलं जातं. तिला पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यानंतर काही काळाने औपचारिकरित्या तिला भारतीय एजन्सीकडे सोपवण्यात आलं होतं.
दोन नागरिकांच्या संपर्कात
प्राथमिक चौकशीनुसार सुनीता गायब होण्यापूर्वी पाकिस्तानातील दोन नागरिक झुल्फिकार आणि पास्टर यांच्या संपर्कात होती. या दोघांनी सुनीताला पाकिस्तानात जाण्यासाठी मदत केली की तिला पाकिस्तानात जाण्यासाठी उद्युक्त केलं याचा तपास सुरू आहे. भारतात असतानाच पाकिस्तानाशी संपर्क ठेवण्यासाठी सुनीताला कुणी मदत केलीय का? याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा फॉरेन्सिक आणि इंटेलिजन्स सखोल तपास करत आहे.
