Nagpur | जल जीवन मिशन! 6 हजार 123 गावांत नळाचे पिण्याचे पाणी; प्रधान सचिव संजीव जैस्वाल

Nagpur | जल जीवन मिशन! 6 हजार 123 गावांत नळाचे पिण्याचे पाणी; प्रधान सचिव संजीव जैस्वाल
प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांचा सत्कार करताना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे

दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देण्यात येते. या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी दिल्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 10, 2021 | 10:53 AM

नागपूर : ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जल जीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येतोय. नागपूर विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये हे मिशन राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देण्यात येते. या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जल जीवन मिशन तसेच ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचा आढावा प्रधान सचिव जैस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन, पाणी व स्वच्छता मिशनचे संचालक ऋषीकेश येशोद, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अवर सचिव श्रीमती अनुष्का दळवी, श्रीमती सरोज देशपांडे, डॉ. रविंद्र भराटे, विकास उपायुक्त अंकुश केदार तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

12 लाख घरांना नळाचे पाणी

जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे बाराही महिने पाणी देण्यासाठी 90 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जैस्वाल म्हणाले, राज्यातील 12 लाख घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे ध्येय साध्य करावयाचे आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावनिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल(डीपीआर) तयार करताना पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत निश्चित करण्यासोबतच स्त्रोत वाढविण्यासाठी इतर योजनांचा समन्वय करुन हे मिशन यशस्वी करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

90 दिवसांचा मिशन कार्यक्रम

जल जीवन मिशन अंतर्गत पाच बाबींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. यामध्ये प्रत्येक घरात पाईप लाईनद्वारे पाणी पुरविणे, प्रति व्यक्ती किमान 55 लिटर बारा महिने पिण्याचे पाणी पुरवठा करणे. तसेच गुणवत्तापूर्ण पाण्याचा दर्जा राखणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा करताना प्रत्येक घराची चेकलिस्ट तयार करुन आराखडा तयार करावा. या आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मान्यता द्यावी. 90 दिवसांच्या मिशन कार्यक्रमांतर्गत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.

आराखड्यात परिस्थितीनुरुप बदल

जल जीवन मिशन आराखडा लोकसहभाग तसेच ग्राम सभेच्या माध्यमातून तयार करायचा आहे. यासंदर्भात लोकांचे प्रबोधन करावयाचे आहे. विदर्भात भूजल पातळी समाधानकारक आहे. परंतु, ज्या गावांना आठ महिने पाणीपुरवठा केला जातो अशा गावात अतिरिक्त पाण्याचा स्त्रोत शोधणे आणि त्याचे बळकटीकरण करताना यापूर्वी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात परिस्थितीनुरुप बदल करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Nagpur Video | कपड्यांवर पेट्रोलचे थेंब उडाल्याने वाद, पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण

Nagpur MLC Election | फक्त दोन ओळखपत्राला मान्यता, मतदानाची वेळ 4 पर्यंत, पसंतीक्रमाने मतदान

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें