
Dharmarao Baba Atram on Sharad Pawar-Ajit Pawar NCP Merge: दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनिकरणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. आतापर्यंत अजितदादा गट या चर्चांवर कानावर हात ठेवत आला आहे. अजितदादा यांच्या अकाली एक्झिटमुळे दोन्ही राष्ट्रवाद एकत्रिकरणाची प्रक्रिया मध्येच थांबल्याचा दावा करण्यात येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आतापर्यंत विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत होते. आता ते दोन पावलं पुढं सरकली आहेत. त्यांनी आता विलीनीकरणासाठी अटी घालायला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशीच अट सकाळी दिलेल्या मुलाखतीत घातली. तर आता विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी तर तीन अटी घातल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे जणू संकेत देण्यात येत आहेत.
विलीनीकरणावर दादा कधीच बोलले नाही
अजितदादा पवार कधीही दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत आमच्याशी बोलले नाही असा दावा राष्ट्रवादी दादा गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. तर विलीनिकरणाची १२ फेब्रुवारी ही तारीख ठरली नव्हती, तारीख ठरली असती तर दादांनी आम्हाला सांगीतलं असतं असे आत्राम म्हणाले. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात याविषयीची चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. तर त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी काही चर्चा सुरू नसल्याचा दावा केला. दादांनी याविषयीची कोणतीही कल्पना दिली नसल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी आम्ही NDA चे घटक पक्ष आहोत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत याचचे आहे. त्यांना एनडीएसोबत यावे लागेल अशी अट त्यांनी घातली.
त्या तीन अटी कोणत्या?
तर राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा तीन अटी घालण्यात आल्या आहेत. या तीन अटी मान्य असतील तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ शकतं असे संकेतच त्यांनी दिले. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आतापर्यंत कानावर हात ठेवणारे नेते आता विलीनीकरणासाठी अटी घालत असल्याचे दिसत आहे.
1. दोन ताईंपैकी सुनेत्रा ताई आमच्या नेत्या आहेत. आम्ही आमचा नेता निवडला आहे. आमच्या पक्षात शरद पवार यांचा पक्ष विलीन झाल्यावर, सुप्रिया ताईंचा रोल काय राहील हे ठरवू. पण नेतृत्व सुनेत्रा ताई यांच्याकडे असेल अशी अट आत्राम यांनी पुढे केली.
2. आम्हाला एनडीए सोबत रहायचं आहे. आमचं चिन्ह घडी आहे. या चिन्हाखाली त्यांनी एकत्र यावं शरद पवार गटाने घडी स्वीकारून एकत्र यावं, सुनेत्रा ताई आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील.
3. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर एनडीए सोबत राहणं गरजेचं आहे, अशी तिसरी अट धर्मराव बाबा आत्राम यांनी घातली. एनडीएसोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन फायदा नाही असा दावा त्यांनी केला.