Maharashtra MLC Election 2026 : 3 वाजेपर्यंत थांबा, मोठा धमाका होणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे सूचक विधान, म्हणाले रणनीती…
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीची रणनीती आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत रणनीती, उमेदवारीचा पेच आणि राज्य सरकारचे अपयश यावर सविस्तर भाष्य केले. निवडणुकीत कोणाला उतरवायचे हा त्या पक्षाचा अधिकार असला, तरी उद्धव ठाकरेंनी स्वतः उमेदवार असावे ही आमची इच्छा होती, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची उमेदवारी आणि महाविकास आघाडीतील जागावाटपांवर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी म्हणून आमचा आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार व्हावे. मात्र, कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे आणि कोणाला नाही, हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा शिवसेना ठाकरे गटाचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे, त्यावर भाष्य करण्याचे कारण नाही, असे नाना पटोले म्हणाले.
मी आत्ताच जाहीर करणार नाही
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. किती अर्ज येतात, त्यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे आम्ही उमेदवार देणार आहोत. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. महाविकासआघाडी शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय असो किंवा उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा, हे सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले होते. पक्ष संघटनेच्या संदर्भात दिल्लीत हायकमांडची भेट घेतील. आमचा उमेदवार निश्चितपणे जिंकेल, पण आमची रणनीती आणि समीकरणे मी आत्ताच जाहीर करणार नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.
जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे
दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती, पण आता पात्र-अपात्रतेचे निकष लावून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असून, जनताच त्यांना धडा शिकवेल, असे ते म्हणाले. तसेच, राम मंदिराबाबत बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानाचा दाखला दिला. राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बांधले जात आहे. पण गृहमंत्र्यांचे विधान न्यायालयाच्या निर्णयापेक्षा वेगळे संकेत देते, हे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
यावेळी नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. संजय राऊत काय बोलतात तो त्यांचा प्रश्न आहे, आम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. माध्यमांनी आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये, असे नाना पटोले यांनी म्हटले.
