आता माघार नाही.., जरांगे पाटलांकडून दसरा मेळाव्यात नव्या लढाईचा एल्गार, सरकारला घाम फोडणाऱ्या 8 मागण्या
आज नारायण गड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा सुरू आहे, हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं आहे.

Image Credit source: tv9 marathi
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज नारायण गड येथे दसरा मेळावा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी त्यांनी मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात केली होती, त्यांच्या आंदोलनाला चांगलंच यश मिळालं, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झालं, दरम्यान हैदरबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर हा मनोज जरांगे पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावा असल्यानं ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.
काय आहेत जरांगे पाटील यांच्या मागण्या?
- सरकारला जाहीपणे सांगतो. मराठवाड्यात आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. दिवाळीच्या आतच करा. सरकारने दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे, अशी पहिली मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
- ७० हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्या. कॅश पिकं जळाले ना. ७० हजार हेक्टरी द्यायचे. मनोज जरांगे बोलतो ते करतो. आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं ना. तुम्ही नीट डोकं लावून ऐका, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
- शेतकऱ्यांना सरसकट ७० हजार रुपये द्यायचे. ज्यांचे शेत वाहून गेले नाही पण शेतात पाणी साचले आहे, पिकं जळाली आहेत त्यांनाही सत्तर हजार रुपये मिळाले पाहिजेत.
- नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले. पिक वाहून गेले, त्यांना १ लााख ३० हजार रुपये भरपाई द्या. आपलं असंच असतं. तज्ज्ञ नाही. अभ्यासक नाही. असंही पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
- ज्याचं शेत वाहून गेलं. पिक गेलं त्याला १ लाख ३० हजार द्या. ज्याचे जनावरे वाहून गेले, बाजरी, सोयाबीन वाहून गेले. त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून १०० टक्के भरपाई दिली गेली पाहिजे. घर पडलं. शेळ्या वाहून गेल्या, भांडी वाहून गेले, सोनं वाहून गेलं. नळ्या वाहून गेल्या, सर्व वाहून गेले तेवढे पैसे द्यायचे.
- शेतकऱ्याच्या उसातून १५ रुपये कापायचे ठरवले आहेत, त्यातला एक रुपयाही कापायचा नाही.
- शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्ही म्हणता नोकरी नाही. १० एकरच्या आत शेती करेल त्याला १० हजार रुपये महिना द्या, अशी मागणीही यावेळी जरांगे पाटील यांनी केली आहे.
- पीक विम्यााला तीन ट्रिगर बसवले ते उठवा. पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्या अशा आठ मागण्या यावेळी जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.
