Nashik|नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार हॉकी लीगचे सामने…!

Nashik|नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार हॉकी लीगचे सामने...!
Hockey

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालयनालयान आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेला युवा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 05, 2022 | 2:39 PM

नाशिकः नाशिकमध्ये उद्या गुरुवारपासून हॉकी लीगचे सामने रंगणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व द हॉकी नाशिक यांच्या संयुक्त् विद्यमाने 06 जानेवारी ते 07 जानेवारी या दोन दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व विद्यालय व स्पोर्टस क्लबमधील खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

येथे होणार स्पर्धा

हॉकी लीग 2021-22 ही स्पर्धा सिनियर गट हॉकी व 17 वर्षे मुले यांच्यासाठी हॉकी टर्फ मैदान, पोलीस अकॅडमी, त्र्यंबकरोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. 17 वर्षे मुले संघातील खेळाडूंची हॉकी स्पर्धा 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता तर सिनियर गट संघातील खेळाडूंची हॉकी स्पर्धा याच दिवशी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. हॉकी लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा कार्यक्रम निश्चिती व प्रवेशिका यादी सादरीकरणाची अंतिम तारीख 1 जानेवारी होती. काही अडचण असल्यास क्रीडा मार्गदर्शक सी. एस. उदार यांना या 9403735492 क्रमांकावर आणि सचिव, द हॉकी नाशिक अजीज सय्यद यांना 9021929786 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

युवा महोत्सव रद्द

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालयनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यामार्फत दोन जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला युवा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे, विविध खासगी युवा मंच यातील इच्छुक कलावंत व स्पर्धकांनी तयारी केली होती. मात्र, त्यांचा आता हिरमोड झाला आहे.

निवड कधी होणार?

25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याकरिता महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येवून स्पर्धकांना विभागस्तरावर सहभागी होता येणार आहे. त्यातून गुणी कलावंतांची निवड करून राज्यस्तरावरील ऑनलाईन युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविण्यात येणार आहे. मात्र, आता ही निवड कधी होणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 पासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दिली आहे.

इतर बातम्याः

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड

Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें