एसटी-रिक्षाच्या भीषण अपघातात सख्ख्या भावांवर काळाचा घाला, जावा बचावल्या

बाळासाहेब चिंधा निकम आणि त्यांचे धाकटे बंधू शांताराम चिंधा निकम या दोघांचा नाशिकमधील एसटी-रिक्षा अपघातात करुण अंत झाला.

एसटी-रिक्षाच्या भीषण अपघातात सख्ख्या भावांवर काळाचा घाला, जावा बचावल्या

नाशिक : नाशिकमध्ये झालेल्या एसटी आणि रिक्षाच्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू (Nashik ST Bus Accident Brothers Death) झाला, तर दोघांच्या पत्नी बचावल्या आहेत. चुलत भावजयीच्या अंत्यविधीवरुन परत येताना निकम बंधूंवर काळाने घाला घातला.

सलून व्यावसायिक असलेले बाळासाहेब चिंधा निकम आणि त्यांचे धाकटे बंधू शांताराम चिंधा निकम या दोघांचा अपघातात करुण अंत झाला. दोघेही भाऊ आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि यशोदाबाई यांच्यासह काल (मंगळवारी) सकाळी मालेगाव येथील श्रीरामनगरमध्ये चुलत भावजयीच्या अंत्यविधीसाठी गेले होते.

अंत्यविधी आटोपल्यानंतर निकम कुटुंब कळवणला यायला निघाले. मालेगावहून धुळे-कळवण एसटीत ते बसले. दोघे भाऊ समोरच्या बाजूला एका सीटवर, तर दोघी जावा मागच्या बाजूला एका सीटवर बसल्या होत्या. मात्र काळाच्या मनात काही वेगळंच होतं.

नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात, दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली, 25 जणांचा मृत्यू

मेशी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एसटी विहिरीत पडली. एसटीतून दोघे भाऊ समोरच्या बाजूने बाहेर फेकले गेले. त्यामुळे दोघांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन्ही महिला सीटला घट्ट पकडून असल्याने अपघातातून वाचल्या.

बाळासाहेब निकम हे शिरसमणीत, तर धाकटा भाऊ शांताराम निकम हे डोंगरगावमध्ये सलूनचा व्यवसाय करत होते. दररोज दोघे डोंगरगाव ते कळवण एसटीने प्रवास करायचे. मात्र भावकीतील चुलत भावजयीच्या अंत्यविधीला दोघ भाऊ सपत्नीक गेले आणि नियतीने घात केला.

अपघातात दोन्ही महिलांच्या कंबर, मान आणि पायांना दुखापत झाली. त्यांच्यावर उमराणे ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बाळासाहेब निकम यांना दोन मुलं आणि एक मुलगी असून शांताराम निकम यांनाही दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

सुरुवातीला बाळासाहेब निकम यांची ओळख पटल्याने पंचनामा होत त्यांचे पोस्टमार्टम करण्यात आले होते. मात्र शांताराम निकम यांचा मृतदेह उशिरा मिळाल्याने त्यांचं पोस्टमार्टम उशिरापर्यंत झालेलं नव्हतं. दोघाही भावांच्या मुलांनी एकाच ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी केली होती. दोघा भावांच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. हातावर पोट असलेल्या दोघाही भावांच्या मुलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा (Nashik ST Bus Accident Brothers Death) होता.