जन्माआधीच मुलीचा बाप…, नाशिक बालविक्री प्रकरणात सर्वात मोठा गौप्यस्फोट, काय आहे सत्य?
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील बरड्याची वाडी येथील कथित बाल विक्री प्रकरणाने खळबळ उडवली आहे. प्रशासनाने तातडीने ९ मुलांना ताब्यात घेतले असून विष्णू हंडोगे व बच्चूबाई हंडोगे यांना अटक केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या बरड्याची वाडी येथील लहान मुलांच्या कथित विक्री प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता याप्रकरणी प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ९ लहान मुलांना ताब्यात घेऊन नाशिकच्या निरीक्षण बालगृहात दाखल करण्यात आले आहे. यात ६ मुले, ३ मुलींचा समावेश आहे.
त्र्यंबकेश्वरमधील मुलांना विक्री केली की दत्तक दिले या संदर्भातील कायदेशीर कारवाईला आता वेग आला आहे. घोटी ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणाशी संबंधित विष्णू हंडोगे आणि बच्चूबाई हंडोगे या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या सर्व नऊ बालकांची सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्यांच्या आरोग्याची सखोल तपासणी केली जात आहे. ज्या मुलांना दत्तक देण्यात आले होते, त्या मुलांना आणि त्यांच्या कथित पालकांना चौकशीसाठी घोटी पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे मुलांना ताब्यात देऊन त्यांची खासगी वाहनाने नाशिककडे रवानगी करण्यात आली आहे.
जन्माआधीच मुलीचा बाप बदलला
या प्रकरणी आता एल्गार कष्टकरी संघटनेने काही कागदपत्रे सादर करत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संघटनेने अनेक आरोप केले आहेत. ही महिला गरोदर असताना पहिल्या महिन्यापासून बनवण्यात येणारे कार्ड बाळाच्या कथित दत्तक पालकाच्या नावाने कसे बनवले, असा सवाल या संघटनेने केला आहे. यामुळे जन्माआधीच मुलीचा बाप बदलला गेला असल्याचा संघटनेचा आरोप आहे. मुलगी आईच्या गर्भात असताना अंगणवाडी सेविकांनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने जन्म दाखला कसा बनवला? असा सवालही उपस्थित केला आहे.
तसेच १०० रुपयाच्या स्टँप पेपरवर साध्या कागदावर सह्या करून दत्तक पत्र तयार केले गेले. यावर तहसीलदारांची सही लागते, जी नसल्याने या दत्तक पत्राच्या वैधतेवर संघटनेने आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण केवळ एका मुलाचे नसून, सर्व मुलांची नियोजनबद्ध पद्धतीने विक्री केल्याचा गंभीर आरोप एल्गार कष्टकरी संघटनेने केला आहे. या सर्व कागदपत्रांच्या आधारावर शिक्षकांनी शाळेचा दाखला बनवला, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.
कसून तपास सुरु
दरम्यान सध्या प्रशासन गठीत केलेल्या समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. तसेच समितीचे सदस्य बरड्याची वाडी येथे महिलेच्या घरी पोहोचले असून याप्रकरणी अजून कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
