सुनील तटकरे यांच्या नावाने कोणी बनावट पत्र, सही, शिक्के.. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा खळबळजनक आरोप
NCP Politics : महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील जनतेला अजित पवार यांच्या अस्थीच दर्शन घेता यावं, यासाठी त्यांचा अस्थीकलश महाराष्ट्रात खेड्या पाड्यात नेला जातोय. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत नवीन घडामोडी घडताना दिसतायत.

“अजित दादांच्या अस्थी विसर्जित होण्यापूर्वीच काहींनी गलीच्छ राजकारण सुरू केलं आहे. सुनील तटकरे यांच्या नावाने कोणी बनावट पत्र, बनावट सही, शिक्के मारून पत्र दिलं का? असा मला संशय आहे. अजित दादांनी मला शब्द दिलेला असताना, सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या” असं प्रश्न हेमलता पाटील यांनी विचारला आहे. हेमलता पाटील या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिकच्या नगरसेविका आहेत. मागच्याच आठवड्यात अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं विमान कोसळलं. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत एक नवीन राजकारण सुरु झाल्याचं दिसतय.
अजितदादांच्या निधनानंतर तीनच दिवसांनी शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड झाली. अजित पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राने एका कर्तुत्ववान नेता गमावला आहे. त्या दु:खातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाहीय. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील जनतेला अजित पवार यांच्या अस्थीच दर्शन घेता यावं, यासाठी त्यांचा अस्थीकलश महाराष्ट्रात खेड्या पाड्यात नेला जातोय. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत नवीन घडामोडी घडताना दिसतायत.
जर एवढ खालच राजकारणं करत असतील तर…
“प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याप्रकरणी खुलासा करावे आणि मला पुढील आदेश द्यावे” अशी हेमलता पाटील यांची मागणी आहे. “अजित दादांच्या मृत्यू नंतर काही लोक जर एवढ खालच राजकारणं करत असतील तर मला काहीच नको” अशी हेमलता पाटील यांनी उद्विग्न भूमिका मांडली. हेमलता पाटील या मूळच्या काँग्रेसच्या. विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, दीड-दोन महिन्यात त्यांनी शिंदे गट सोडला. त्यानंतर हेमलता पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या 30 ते 35 वर्ष काँग्रेसमध्ये होत्या. त्यांच्याकडे 6 टर्म नगरसेवक पद भूषवण्याचा अनुभव आहे. यंदाची त्यांची सातवी टर्म होती.
