Prithviraj Chavan : भाजपला बाजूला ठेऊन 2014 मध्ये सरकार स्थापनेचा प्रस्ताव होता, पृथ्वीराज चव्हाण यांचा नवीन खळबळजनक गौप्यस्फोट
"35 हजार कोटींचा आकडा दिला, हा खर्च कसा करणार. सरकारकडे पाशवी बहुमत आहे. विधानसभेत आमच्याकडे कमी लोक आहेत. पक्ष फोडाफोडी सुरु आहे" असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. “डिसेंबर 2014 मध्येच महाविकास आघाडी म्हणून सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापनेचा 2014 सालीच प्रस्ताव आलेला. पण मी तिथल्या तिथे तो प्रस्ताव रिजेक्ट केला. त्यावेळी मी तो प्रस्ताव रिजेक्ट केला. आमच्या पक्षाला शिवसेनेसोबत जाणं मान्य होणारच नव्हतं. पुढे 2019 साली मीच मविआचा प्रस्ताव पुढे केला” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांना केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार अशी सुद्धा चर्चा आहे. त्यावर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. “देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जायचं आहे की नाही, हे मला माहित नाही. पण महाराष्ट्रातली व्यक्ती दिल्लीत जाणार असेल तर ती बढतीच म्हटली जाईल. पण ही बढती आम्हाला मान्य नाही” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभ मेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. त्यांनी राज्य सरकारवर या मुद्यावरुन जोरदार टीका केली आहे. “गेल्यावर्षी तीन ते साडेतीन हजार कोटीचा खर्च झाला. आता 35 हजार कोटीचं बजेट काढलं आहे. कुठलही सरकारी बजेट दीडपट वाढतं. या सुविधा आहेत, कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट नाहीय. लोड कॅरिंग कॅपेसिटीची विचार केलेला नाही. मागे 40 लाख लोक आले होते. आता 6 कोटी लोक येतील सरकारच म्हणणं आहे. खरचं 6 कोटी लोक येतील का?” असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनावरुन त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “6 कोटी लोक आले तर एवढ्या नागरिक सुविधा बनवल्या आहेत का? पर्यावरणावर याचा काय परिणाम होणार? याचा विचार केलेला नाही. हा पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे. कोण म्हणत अमित शाह करतायत, कोण म्हणतं केंद्र सरकार, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही. नगरविकास खात यात असलं तरी यात कुठे एकनाथ शिंदेंचा रोल दिसत नाही” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“नवीन पालकमंत्री नेमलेत ते नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागतात. बडे बंगले घेतलेत त्यांनी. खर्च होईल. हिंदू धर्माचा पवित्र सण आहे. वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कोणी केलय का? 6 कोटी लोक येतील सांगतयात. पण 40 लाखच लोक आले तर, नियोजनाच्या नावाखाली पैसे खर्च करतायत. सिविल कॉन्ट्रॅक्टमध्ये यांना फक्त इंटरेस्ट आहे” असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. “समृद्धी महामार्ग झाला. पण तिथे बाकीच्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. हा महामार्ग कॉन्ट्रॅक्टरसाठी होता का? लोकांच्या सुविधेसाठी होता का? काल येताना पाहिलं काही सुखसोयी केलेल्या नाहीत, थांबे केलेले नाहीत. शक्तीपीठ महामार्ग काढला, 1 लाख कोटीचा बजेट आहे, ते दीडलाख कोटीपर्यंत जाईल. कुंभमेळ्याचं 35 हजार कोटी बजेट शॉकिंग आहे” असं ते म्हणाले.
प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का
“नाशिकच्या लोकांना विचारलं पाहिजे, काय केलं पाहिजे. लोड कॅरिंग कॅपेसिटी महत्वाची असते. 40 लाख एकादिवशी आले, स्नान केलं, तो लोड झेपणार आहे का?. सगळा वेस्ट गोदावरी नदीत टाकणार का? पर्यावरणाचा अभ्यास केलाय का? मुख्य सचिवांना, आयुक्तांना विचारणार आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का?. विजय वडेट्टीवारांना फोन करुन सांगणार प्रोजेक्ट रिपोर्ट मागवा. उघड चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस कमिटीला सांगणार एनालिसिस करा. मुंबई, दिल्ली, पुण्याच्या लोकांना बोलवा. खरच काही सायटिफिक अभ्यास केला पाहिजे” अशी गरज पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली.
35 हजार कोटींचा आकडा दिला, हा खर्च कसा करणार. सरकारकडे पाशवी बहुमत आहे. विधानसभेत आमच्याकडे कमी लोक आहेत. पक्ष फोडाफोडी सुरु आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
