अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये; पालकमंत्री भुजबळांच्या सूचना

नाशिकमधील अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये; पालकमंत्री भुजबळांच्या सूचना

नाशिक : राज्यात अतिवृष्टीमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. दुर्दैवाने काही ठिकाणी अल्प पाऊस असून धरणसाठा देखील कमी आहे. तर काही भागात अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असून, जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. (Farmers affected by heavy rains should not be deprived of Panchnama; Chhagan Bhujbal)

नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, सोपान कासार, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, दिपक पाटील यांच्यासह दोनही तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येत असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करुन त्यांना न्याय देण्याचे काम होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला, महसूल, कृषी, आरोग्य व नगरपरिषदेने पूर्ण ताकदीने काम करुन बाधितांच्या पुर्नवसनाचे काम तातडीने करावे. शेतशिवारासह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाप्रती संवेदनशील राहून प्रशासनातील प्रत्येक घटकाने त्याला न्याय देण्याबरोबर त्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी यथोचितरित्या पार पाडावी. झालेल्या नुकसानीचे पंचनामे व तातडीच्या मदतीसह नुकसान झालेल्या बंधारे व रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शहरातील गाळ व चिखलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी शहराची साफसफाई तातडीने करण्यात यावी. यासाठी फायर ब्रिगेडची लागणारी यंत्रणा तातडीने मागवून शहरातील सर्व चिखल साफ करण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरूस्तीचे कामे तातडीने हाती घ्यावी, तर खंडीत झालेला वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शिवभोजन थाळीच्या मर्यादेत वाढ

नांदगाव तालुक्यातील आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन थाळीच्या मर्यादा 150 वरुन 300 करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिले. तर नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

यावेळी आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून आपत्कालीन निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. तर जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी आहेर यांनी जिल्हा परिषदेच्या 2702 अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

नुकसानग्रस्त भागांची केली पहाणी

यावेळी सर्वप्रथम मालेगाव तालुक्यातील जाटपाडे व नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

इतर बातम्या

कोरोनाचा प्रादुर्भाव घटला, पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; आंबेडकरांची मागणी

Aurangabad Crime: धारदार शस्त्रानं हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली अंघोळ, घटनास्थळही धुऊन काढलं, ढोरकीन गाव पहाटेच हादरलं

VIDEO: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, गृहमंत्र्यांकडे मागणी करणार: नवाब मलिक

(Farmers affected by heavy rains should not be deprived of Panchnama; Chhagan Bhujbal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI