Hanuman Chalisa VIDEO | राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, नाशकातही भोंग्यावर हनुमान चालिसा
मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान सुरु झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरु केल्याने राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू, असा इशारा गुढी पाडव्यानिमित्त मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत दिला होता. त्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी कार्यालयाबाहेर लाऊडस्पीकर लावून रविवारी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) सुरु केली होती. त्यानंतर नाशकातील भद्रकाली परिसरातही मनसेने भोंगे लावल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात (Nashik) इतरत्रही भोंगे लावण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन आहे.
राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं
मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान सुरु झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरु केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरु केली आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही, तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
घाटकोपरमध्ये हनुमान चालिसा
मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली होते. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हनुमान चालिसा सुरू करण्यात आली होती.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
शिवाजी पार्कवर गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शनिवारी भाषण केले. यावेळी अनेक विषयांवर बोलताना मशिदीवरील भोंग्यांनाही त्यांनी विरोध केला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? मी कोणत्याही प्रार्थनेविरोधात नाही. तुम्ही तुमची प्रार्थना जरुर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको. युरोपात तरी कुठे भोंगे आहेत? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते.
पाहा व्हिडीओ :
नाशिक – भद्रकाली परिसरात मनसेने लावले भोंगे, हनुमान चालिसा लावत राज ठाकरे यांच्या आदेशाचे केले पालन, शहरात इतरत्र देखील भोंगे लावण्याचे नियोजन, राज यांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक pic.twitter.com/O4GYjoKHVD
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2022
संबंधित बातम्या :
‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ सुजातचं चॅलेंज ‘राजपुत्र’ स्वीकारणार?
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?
