कौमार्य चाचणीचा मुद्दा अभ्यासक्रमात असल्यानं अंनिस आक्रमक, अखेर विद्यापीठाने विषय वगळला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Updated on: Aug 03, 2021 | 7:11 PM

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर कौमार्य चाचणी हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलाय.

कौमार्य चाचणीचा मुद्दा अभ्यासक्रमात असल्यानं अंनिस आक्रमक, अखेर विद्यापीठाने विषय वगळला

मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर कौमार्य चाचणी हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलाय. विद्यापीठाच्या या निर्णयाचं अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वागत केलं आहे. याआधी वैद्यकीय अभ्यासक्रमात बलात्कार पीडित महिलांची कौमार्य चाचणी कशी घ्यावी हा भाग शिकवला जात होता. याला अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका निवेदनाद्वारे आक्षेप घेतला. तसेच हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. त्याची दखल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने घेतली.

वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फींगर टेस्ट’चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पीडित स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासणी करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते. परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय आहे, असा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता.

“कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचं उल्लंघन”

अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते, पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नाही. कौमार्यता हा खुपच वैयक्तिक विषय आहे. कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होतं, अशी भूमिका अंनिसने घेतली.

“वैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमातून कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम”

अंनिसचे कृष्णा चांदगुडे म्हणाले, “महाराष्ट्राच्या काही भागातील काही समाजातील कौमार्य भंग चाचणीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आमच्या पुढाकार व प्रयत्नाने राज्य सरकारने केलेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अंतर्गत त्यातील काही घटनांत रितसर गुन्हे दाखल केले गेले आहेत. वैज्ञानिकदृष्टीने कौमार्य भंग चाचणीचा व चारित्र्याचा काहीही संबंध नाही. सामान्यत: खेळताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना गुप्तांगातील पातळ पडदा फाटू शकतो, असे शास्त्रीय प्रबोधन आम्ही समाजात करीत आहोत. मात्र, अशा कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम आपल्या वैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत आहे.”

“कौमार्य चाचणी अवैद्यकिय”

“कौमार्य चाचणी ही अवैद्यकिय असल्याचे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या बोलण्यातून पुढे आले आहे. वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्रा. डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी, अशा आशयाचा अहवाल तयार करुन दिला आहे. जात पंचायतींकडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर महा अंनिसच्या जात पंचायतीच्या मूठमाती अभियानाच्या पुढाकारामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा,” अशी मागणी महा अंनिसने केली होती. आता देशस्तरावर अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिलच्या अभ्यासक्रमातून हा विषय काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

VIDEO: लातूरमध्ये मुलीच्या डोळ्यातून तांदूळ, ज्वारी व दगडाचे कण निघतात, कारण काय?

अंनिसच्या मागणीला यश, अखेर पुण्यातील कथित गुरू येमुलवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचं वक्तव्य

व्हिडीओ पाहा :

MUHS remove virginity test topic from Medical syllabus after ANIS demand

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI