नाशिकच्या विकासासाठी ‘नियो मेट्रो’ प्रकल्प यशस्वी करणार; छगन भुजबळांची ग्वाही

'नियो मेट्रो' प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या विकासासाठी 'नियो मेट्रो' प्रकल्प यशस्वी करणार; छगन भुजबळांची ग्वाही
Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis

नाशिक : निसर्गरम्य असलेल्या नाशिक शहराला प्रदूषणमुक्त ठेऊन शहराचे हवामान संतुलित ठेवण्यासाठी आणि नाशिकच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कटीबध्द राहणार आहोत. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मेडीकल हब, पर्यटन हब, आयटीपार्क, वायनरी सारखे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच दळणवळणाच्या विकासासाठी ‘नियो मेट्रो’ प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येऊन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Neo Metro project will be successful for the development of Nashik says Chhagan Bhujbal)

कालिदास कलामंदिर येथे आयोजित सिटीलिंक नाशिक शहर बससेवा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, उपमहापौर भिकुबाई बागुल, आमदार सीमा हीरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गिते, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेने सुरु केलेली सिटीलिंक नाशिक शहर बससेवेत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असल्याने नक्कीच नाशिककरांना प्रवास करताना त्याचा लाभ होणार आहे. परंतु सिटीलिंक बससेवा यशस्वी होण्यासाठी योग्य ते नियोजन महानगरपालिकेने करावे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिकेने एकूण 250 बस कार्यान्वित केल्या असून त्यामध्ये 200 बस सीएनजी असून 50 बसेस डिझेलवरील आहेत. परंतु येणाऱ्या काळात प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण विरहीत इलेक्ट्रीक बससेवा सुरु करण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या संकटाचा सामना नाशिक जिल्ह्याने अत्यंत संयमाने केला असून या कठीण प्रसंगी शासन व प्रशासनाच्या योग्य नियोजन व मेहनतीने कोरोनाला नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. तसेच शासन व प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने येणाऱ्या नवीन आवाहनासाठी सज्ज आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

‘नियो मेट्रो’प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार : देवेंद्र फडणवीस

नाशिकचे नियो मेट्रो प्रकल्पाचे मॉडेल देशातील ग्लोबल मॉडेल म्हणून विकसित करण्यात येत असून प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहराला प्रदूषण विरहीत बससेवा देण्यासाठी 50 इलेक्ट्रिक बसच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेने सुरु केलेली आधुनिक सिटीलिंक नाशिक शहर बससेवा प्रवाशांना नक्कीच सोयीची व आरामदायी होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी रिमोटद्वारे सिटीलिंक नाशिक शहर बससेवेच्या कोनशिला, सिटीलिंक नाशिक शहर बससेवेच्या लोगोचे तसेच मोबाईल ॲप, संकेतस्थळाचे अनावरण पालकमंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. तसेच महापौर सतीष कुलकर्णी यांनी ‘जलनिती अभियान’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

इतर बातम्या

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, खडसेंच्या ईडी चौकशीवरुन भुजबळांचा भाजपवर वार

मुंडे भगिनी नाराज नाहीत तर अभिनंदनाचं एक ट्विट का नाही? फडणवीस म्हणाले, बदनाम करू नका? वाचा सविस्तर

(Neo Metro project will be successful for the development of Nashik says Chhagan Bhujbal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI