नाशिकमध्ये कृत्रिम तलावात पोहोण्यासाठी गेलेले 3 अल्पवयीन बुडाले, परिसरात शोककळा
नाशिकच्या बिडी कामगार परिसरातील बांधकाम स्थळावरील कृत्रिम तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालपासून बेपत्ता असलेल्या मुलांचे मृतदेह अग्निशमन दलाने तलावातून बाहेर काढले.

नाशिक शहरातील बिडी कामगार परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका बांधकाम साईटवर तयार केलेल्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील बिडी कामगार परिसरात एक बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. या तलावात दुपारी तीन अल्पवयीन मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र त्यानंतर दुपारपासून ही मुलं बेपत्ता झाली होती. यानंतर त्या मुलांचा शोध घेतला जात होता. यानंतर कृत्रिम तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे आढळून आले.
त्यानंतर या तिघांचा कृत्रिम तलावात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आढळून आल्याने शोधकार्याला गती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. यानंतर अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. सध्या आडगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या आठ दिवसांत महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांत बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. वणी-सुरगाणा, रत्नागिरी, यवतमाळ, वर्धा आणि मीरा भाईंदर या ठिकाणी घडलेल्या घटनांनी संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
वणी-सुरगाणा रस्त्यावर शेततळ्यात बुडून नवविवाहितेचा मृत्यू
वणी-सुरगाणा रस्त्यावरील उमरेमाळ येथे नवविवाहित कावेरी योगेश जाधव (२०) हिचा घरालगतच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मे महिन्यातच तिचा विवाह योगेश जाधवसोबत झाला होता. २५ जून रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह शेततळ्यात तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता, हा मृतदेह कावेरीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना कावेरीच्या वहीत एक चिठ्ठी सापडली असून, त्यात ‘मी स्वतः माझे आयुष्य संपवत आहे, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही’ असा मजकूर आहे. मात्र, माहेरच्या नातेवाईकांनी हे हस्ताक्षर कावेरीचे नसल्याचा आरोप करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. कावेरीचा मृत्यू नेमका कसा झाला, चिठ्ठीतील हस्ताक्षर खरे आहे का, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
रत्नागिरीत दोघांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तिवरे देवळे येथे काजळी नदीत वाहून गेल्याने दिपक गोरूले (देवरूख) यांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात घडली. या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेलेल्या नवनाथ नाचणेकर या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. देवरूख आणि राजापूर पोलीस स्थानकात या घटनांची नोंद करण्यात आली आहे. अणसुरे खाडीतील शोधकार्य रात्री थांबवण्यात आले होते.
यवतमाळमध्ये एकाचा नाल्यात बुडून मृत्यू
यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे एका हृदयद्रावक घटनेत राजु रोकडे (५५) या शेतकऱ्याचा बैलगाडीसह नाल्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी शेतातून परत येत असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी बैलगाडी थांबवली. पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह ते नाल्यात वाहून गेले. गावाजवळील नाल्यावर एक बैलगाडी आणि एक बैल तरंगताना दिसल्यानंतर गावकऱ्यांनी गर्दी केली. गावातील तरुणांनी पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले असता, मृत अवस्थेत बैलगाडी आणि बांधलेला एक बैल मिळाला. त्यानंतर, एक ते दोन तासांच्या शोधकार्यानंतर राजु रोकडे यांचा मृतदेह हाती लागला. या घटनेने दहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वर्ध्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
वर्ध्यातील पवनार येथील धाम नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या यश चव्हाण (२६) या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी (२३ जून) तो मित्रांसह फिरायला गेला होता आणि पोहत असताना काही अंतरावर त्याला श्वास भरून आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी आणि काही स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मीरा भाईंदरमध्ये पोहत असताना तरुणाचा बुडून मृत्यू
मीरा भाईंदरमधील चेना नदी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चेना नदी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी अंधेरी येथील प्रणय पळसमकर या तरुणाचा पोहत असताना बुडून मृत्यू झाला. त्याचे सोबतचे दोघे मित्र भाईंदर येथील असून ते बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी नागरिकांना धोकादायक आणि खोल पाण्याच्या ठिकाणी विनापरवानगी पोहण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे.
