नवी मुंबई : एकीकडे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. शिवाय देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. असाच एक हतबल शेतकरी आज (13 जुलै) नवी मुंबईत हैराण झाला आहे. गेल्या दोन वर्षात 10 वेळा नाशिकहून मुंबईवारी करून सुद्धा या वृद्धाला न्याय मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याने वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याने या वृद्ध शेतकऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमनाथ गणपत सानप असं या 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे. हे शेतकरी भाजीपाला व्यापाऱ्याकडे हेलपाटे घालून थकले आहे. शिवाय हा शेतकरी आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या बाजार समिती सभापतींना हाथ जोडून न्याय मिळवून देण्याची विनवणी करत आहे.