एपीएमसीत मनसेच्या विभाग प्रमुखाला जुगार खेळणाऱ्या टोळक्याकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरु

फुटपाथवर जुगार खेळणाऱ्या 50 ते 60 लोकांच्या जमावाने कुलाबाचे मनसे विभाग प्रमुख वैभव शिंदे यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे (MNS party worker beaten up inhumanly by gambling gang at Navi Mumbai APMC).

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 15:44 PM, 26 Feb 2021
एपीएमसीत मनसेच्या विभाग प्रमुखाला जुगार खेळणाऱ्या टोळक्याकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरु
एपीएमसी मार्केटमध्ये फुटपाथवर जुगारांचा अड्डा, अनेकजण त्रस्त, मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भयानक घटना घडली आहे. फुटपाथवर जुगार खेळणाऱ्या 50 ते 60 लोकांच्या जमावाने कुलाबाचे मनसे विभाग प्रमुख वैभव शिंदे यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वैभव शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. एपीएमसीच्या मॅफको मार्केट परिसरात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली (MNS party worker beaten up inhumanly by gambling gang at Navi Mumbai APMC).

नेमकं काय घडलं?

मनसेचे विभाग प्रमुख वैभव शिंदे हे एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये मापाडी कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या मित्रांसोबत मशिद बंदर येथून एपीएमसी कांदा बटाटा मार्केट येथे कामाला येत होते. दरम्यान, सानपाडा स्टेशनला उतरून गोदामा समोरून बाजार समितीत जात असताना एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. चार जणांपैकी दोघांना गंभीर मारहाण करण्यात आली. टोळक्याने त्यांच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला.

लाकडी बांबू, दगड विटा आणि लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण

पन्नास ते साठ जनांचा जमाव फुटपाथवर जुगार खेळत बसला होता. यावेळी वैभव शिंदे आणि त्यांचे मित्र फुटपाथवरुन जात होते. त्यांनी जुगार खेळणाऱ्यांना बाजूला व्हायला सांगितलं. त्याचबरोबर फुटपाथवर जुगार खेळू नका, असं सांगितलं. याच कारणावरुन जमावाने वैभव शिंदे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी बांबू, दगड विटा आणि लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. त्यात वैभव शिंदे दोनदा बेशुद्ध झाला होतो. या घटनेची माहिती मिळताच शिंदे यांचे बाजार समितीमधील इतर सहकारी कर्मचारी आल्याने या जमावाला रोखता आले.

सीसीटीव्हीत घटना कैद

दगड आणि विटा मारताना हात पकडला गेल्याने प्राण वाचल्याचे पिडीत तरुण वैभव शिंदे यांनी सांगितले. शिवाय घडलेला सर्व प्रकार सभोवताली लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घटनेतील जमावावर कायदेशीर कारवाई करणे स्थानिक पोलिसांना सोपे जाणार आहे (MNS party worker beaten up inhumanly by gambling gang at Navi Mumbai APMC).

एकाला अटक

याशिवाय मारहाण करणाऱ्या टोळीतील एकाला शेवटपर्यंत पकडून ठेवण्यात तिथे उपस्थित असलेल्या लोकांना यश आलं आहे. त्यांनी संबंधित आरोपीला एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. वैभव शिंदे आणि गणेश वायकर या दोन्ही तरुणांना पोलिसांनी वाशी सेक्टर 10 येथील महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मेंदूलाही मार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्या दोघांवरही पुढील उपचार चालू करण्यात आले आहे.

एपीएमसीत जुगारांचा धुमाकूळ

या परिसरात दररोज ठिकठिकाणी जमावाने हे लोक जुगार खेळत असतात. एकमेकांत भांडण करणे, वाद घालणे, मोठमोठ्याने शिव्यांची लाखोळी वाहणे असे प्रकार नेहमीच होत असतात. या परिसरातील सर्वच फुटपाथवर दिवसरात्र कब्जा करून हे लोक बसलेले असतात. रिक्षा चालक आणि हॉटेल मालक यांना या लोकांचा मोठा त्रास असल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : नासाच्या मंगळयानासमोर मोठे संकट! मंगळावरील वादळात टिकू शकेल का Perseverance Rover?