मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला

राज्यभरातून शेतमाल येत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने एपीएमसी मार्केट कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे.

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 23:06 PM, 3 Apr 2021
मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला

नवी मुंबई : राज्यभरातून शेतमाल येत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने एपीएमसी मार्केट कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका बसून रुग्ण कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातील बैठकीत शुक्रवारी (19 मार्च) देण्यात आलेल्या सभापतींच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे (Violation of corona prevention regulation in APMC Navi Mumbai).

राज्यासह नवी मुंबई शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि प्रसार पाहता काही उपाययोजना करण्यात आल्या. यावेळी बाजार आवारात करावयाच्या उपाययोजनांबाबत सभापती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत 12 मुद्दे नमूद करण्यात आले. परंतू 15 दिवस उलटून देखील केवळ अपवादात्मक मुद्दा प्रत्यक्षात आला असल्याचे दिसत आहे. बाकीच्या सर्वच मुद्द्यांना संबंधित घटकांनी फाटा दिल्याचे दिसत आहे.

महापालिकेची धडपड परंतू एपीएमसी प्रशासन ढिम्म

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा प्रतिदिन जवळपास 1000 झाला आहे. शिवाय महापालिका विविध उपाययोजना करत आहे. आयुक्त अभिजित बांगर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 8 विभागात विशेष पथकाद्वारे कारवाई करत आहेत. परंतू बाजार समितीमधील प्रमुख घटकांकडून सहकार्य मिळत नसल्याने बाजार आवारात मास्क न वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि सॅनिटायजरचा उपयोग करणे या नियमांचे उल्लंघन सर्रास होताना दिसत आहे.

एपीएमसीच्या उपाययोजना कागदावरच

सुरक्षा रक्षकांकडून अधिक सुरक्षा रक्षक तसेच गार्ड मागवण्यात आले नाहीत. बाजार आवारात वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेण्यात आली नाही. त्यांना ओळखपत्र दिले गेले नाहीत. शिवाय रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या नाहीत. फळ आणि भाजीपाला गाळ्यांवर वास्तव्यास असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती घेतली गेलेली नाही. बाजार आवारातील अनेक घटक लसीकरणापासून वंचित आहेत. कांदा बटाटा मार्केट वगळता इतर कोणत्याही मार्केटमध्ये धुरीकरण नाही. कलिंगड आणि खरबूजा व्यापाऱ्यांचे स्थलांतर केले गेले नाही. कोणत्याही मार्केटमध्ये जनजागृती अथवा नियम पाळण्याचे आवाहन नाही. अँटीजेन टेस्टमध्ये वाढ नसून ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन केले जात नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई बाजार समिती म्हणजे मोठे घर पोकळ वासा

राज्यासह राज्याबाहेरील विविध शहरांतून बाजार समितीतील पाचही मार्केटमध्ये जवळपास 2000 गाड्यांची आवक होत असते. त्यामुळे प्रतिदिन लाखो लोकांची वर्दळ या एपीएमसी मार्केटमध्ये होत असते. कोरोना रुग्ण वाढलेल्या अनेक शहरांमधून लोक व्यापार आणि कामानिमित्त बाजार आवारात येत असतात. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून रविवारी सुट्टीच्या दिवशी भाजीपाला आणि फळ मार्केट चालू ठेवण्यात येते.

घाऊक बाजारात किरकोळ व्यापार केला जातो. ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेत व्यापारी व्यापार करतात. मार्केटमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन तर केले जातेच पण उपाययोजना देखील राबविण्यात येत नाहीत. शिवाय सध्या संचालक, व्यापारी आणि काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. तर कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. जर कोरोना नियमांचे पाळले गेले नाही तर भविष्यात एपीएमसी मार्केटमध्ये मृत्यूचा तांडव पाहायला मिळू शकतो.

हेही वाचा :

बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, मनपा आणि पोलिंसानी अनोखी शक्कल का लढवली?

रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार, सातशे डझन आंब्याच्या निर्यातीची तयारी

कांदा शेतकऱ्यांना रडवणार, कांद्याचे दर 500 रुपये क्विंटलपर्यंत घसरले

व्हिडीओ पाहा :

Violation of corona prevention regulation in APMC Navi Mumbai