राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
नवनाथ बन यांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पिसाळलेली लोक म्हटल्यानंतर बन यांनी कोल्हेकुई म्हणत टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी कान टोचल्यादी देखील टीका बन यांनी केली.

रोहित पवारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा सहावा दिवस आहे. या आंदोलनातून रोहित पवारांकडून कठोर शब्दात टीका केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानंतरही आंदोलकांकडून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काल आंदोलनस्थळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. 70 हजार नोकरभरतीवरून रोखठोक भूमिका मांडली. आता यावरुन भाजप नेते नवनाथ बन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.
भाजपचे नवनाथ बन म्हणाले, ‘ MPSC आयोगाच्या अध्यक्षांना राज्यपाल किंवा राष्ट्रपतीकडे राजीनामा द्यावा लागतो. रोहित पवारांना संविधानाचा अभ्यास करावा. रोहित पवारांना अफवा पसरवण्याचे काम आहे. त्यांचं काहीही कर्तृत्व नाही. आजोबा मुख्यमंत्री होते, म्हणून रोहित पवार आमदार झाले. ते नसते तर रोहित पवारांना ग्रामपंचायतचं सदस्य केलं नसतं. रोहित पवार हे अंहकारासाठी आंदोलन पेटवत आहेत. हा अंहकार रोहित पवारांचा आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन केलं जात आहे. रोहित पवार खोटं बोलण्याचे काम करत आहेत. त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा. राजीनामा कोणाला द्यावा लागतो, हे समजून घ्यावे. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे बारामती अॅग्रोचे कार्यकर्ते आणावे लागले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे बारामतीमधून कार्यकर्ते आयात करावे लागले’.
‘काल राज ठाकरेंनी रोहित पवारांच्या आंदोलनात जाऊन बिंग फोडलं. राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, आयोगाच्या अध्यक्षांना हटवता येणार नाही, 1950 चा कायदा आहे. 1950 च्या कायद्यानुसार त्यांना संरक्षण मिळत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरेंनी तोंडावर सांगितलं की, दुसरं सरकार आल्यानंतरही सगळं काही हे होऊ शकत नाही. राज ठाकरेंचे आभार मानतो. आंदोलनस्थळी जाऊन त्यांचं बिंग फोडलं. रोहित पवार, तुम्ही उद्योगपतींचे ड्रायव्हर झाला, तेव्हा तुम्ही स्वाभिमान गहान ठेवला होता. बारामतीत अदानी आले, तेव्हा त्यांचं वाहन चालवताना त्यांचा ड्रायव्हर होताना तुम्ही स्वाभिमान गहान ठेवला होता. रोहित पवार हे मला भूंकतो, अशी टीका करतात. परंतु तुमची कोल्हेकुई महाराष्ट्रांनी पाहिली आहे. रोहित पवारांनी स्वाभिमान उद्योगपतीच्या चरणी गहाण ठेवला. रोहित पवार हे मला सोशल मीडियावरील कमेंट्स वाचण्यासाठी सांगतात. खंरतर त्यांनी ट्रोलधाड ही माझ्या पोस्टवर कमेंट्स करण्यासाठी लावली आहे. मला ट्रोल करण्यासाठी 2 कोटींचं बजेट ठेवलं आहे. त्या माध्यमातून ट्रोल करत आहेत. मी ट्रोलिंगला घाबरणारा नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याआधी अभाविपचा कार्यकर्ता होतो. मी बीडमधून काम केलं. तुम्ही राजकारणात कुठेही नव्हता. विद्यार्थी आंदोलनात नव्हता. त्यावेळी काँग्रेसचं सरकार असताना मी 2004 साली अभाविपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजोबाच्या जीवावर आमदार झालेल्यांनी भाजपवर टीका करू नये, असा पलटवार भाजपच्या बन यांनी केला.
