
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झाल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. त्याबाबतच्या अनेक बैठका झाल्या होत्या. अजित पवार यांना काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच काम करायचं होतं. पण अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचं हे स्वप्न अर्धवट राहिलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नसल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असलं तरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अंतिम बैठकीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा अंतिम बैठकीचाच फोटो आहे की नाही याबाबत टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही. पण या फोटोने अख्खा सोशल मीडिया व्यापून घेतला आहे. त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. या फोटोत नेमकं काय दिसत आहे?
सोशल मीडियात या कथित फोटोची चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू असल्याच्या बैठकीचा हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोत शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे अन्य नेतेही दिसत आहेत. विशेष म्हणजे अजितदादा त्यांच्या पक्षाच्या वतीने एकटेच विलिनीकरणावर चर्चा करत होते. इतर नेते आपल्या शब्दावर तयार होतील, असं अजितदादांनी पवार गटाला सांगितल्याचं पुढं आलं आहे.
टोपे काय म्हणाले?
दरम्यान, या व्हायरल फोटोवर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बारामतीच्या बैठकीतील हा फोटो आहे. ही अनौपचारिक भेट होती, असं राजेश टोपे म्हणाले. 17 जानेवारी रोजी बारामतीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ही काही औपचारिक राजकीय बैठक नव्हती. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही बारामतीत होतो. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केलं होतं. अजितदादा नाश्त्याला आले. त्यावेळी अनौपचारिक गप्पा झाल्या, असं राजेश टोपे म्हणाले.
या बैठकीला राजकीय रुप देणं योग्य नाही, असं टोपेंनी सांगितलं. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पार्टी एकत्र येण्याची इच्छा आहे. ती भावना अजितदादांनी शरद पवार यांना बोलून दाखवली होती, असंही त्यांनी सांगितलं. तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांनी केली.
राजकीय समीकरणं बिघडली
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय समीकरणं बिघडली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. आता त्याचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. त्याबाबत अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजितदादा गटाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यावर पहिलं प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी मागे पडलेल्या दिसत आहेत.