मविआचं टेन्शन वाढलं! पवार गटाचा प्रसिद्ध चेहरा नागपुरातून अपक्ष निवडणूक लढवणार, मोठी रॅली काढून अर्ज भरणार!
परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त शासकीय सेवेतल्या भरत्या निघाल्या पाहिजे यासह विविध मुद्दे घेऊन रिंगणात उतरणार आहे, असे नितेश कराळे यांनी सांगितलेय.

Nitesh Karale : राज्यात शिक्षक आणि वदवीधर मतदरासंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय नेते आपली ताकद वापरत आहेत. महायुतीतील जागावाटप सध्या समोर आले आहे. समोर आलेल्या जागावाटपानुसार पुणे पदवीधर, पुणे शिक्षक व नागपूर पदवीधर मतदारसंघ अशा एकूण तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. तर अमरावतीची जागा शिवसेनेला आणि छत्रपती संभाजीनगर येथील जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. या जागावाटानंतर आता बंडखोरीचा धोका वाढला आहे. अनेक नेत्यांनी काहीही झालं तरी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणारच, अशी भूमिका घेतलीय. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही सर्वकाही आलबेल नाही. काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने ठाकरे गट आणि शरद पवार गटात नाराजी आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून नितेश कराळे मास्तर निवडणूक लढवणार आहेत.
नेमकी काय माहिती समोर आली?
समोर आलेल्या माहितीनुसार नागपूर पदवीधर मतदारसंघात नितेश कराळे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितेश कराळे गुरुजी यांची अपक्ष निवडणुकीत उभे राहण्याची तयारी केली आहे. आपण येत्या 5 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असे नितेश कराळे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मी रॅली काढणार आहे. विविध जिल्ह्यातून माझे समर्थक येणार आहेत, अशी माहितीही कराळे यांनी दिलीय.
कराळे कोणते मुद्दे घेऊन मैदानात उतरणार
हा उमेदवारी अर्ज दाखल करताना बेरोजगार लोकांचे प्रश्न घेणे, पदवीधर बेरोजगार,. MPSC चा पेपरफुटीच मोठ प्रकरण आहे. परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त शासकीय सेवेतल्या भरत्या निघाल्या पाहिजे यासह विविध मुद्दे घेऊन रिंगणात उतरणार आहे, असे नितेश कराळे यांनी सांगितलेय. त्यामुळे आता नितेश कराळे मैदानात उतरल्यास महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते. कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनात त्यांनी थेट उडी घेऊन इतर आंदोलकांना पाणी, जेवण वाटपाचे काम केले होते. तेव्हापासून ते जास्तच चर्चेत आले.
