‘अजितदादा, मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा’, लक्ष्मण हाकेंची खोचक टीका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरींवरून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. अजितदादा, मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे अजितदादांनी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये, शरद पवार यांचा वारसा सांगू नये, अशी टीका हाकेंनी केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. “अजितदादांनी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये. शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. युपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं शोभत नाही, त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नका. तुम्हाला बाबासाहेब वगैरे कळणार नाहीत. तुमची कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं? आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा. तो तुम्हाला तोंड काळं करायला लावणार”, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.
मिटकरींबद्दल टीका करताना ते पुढे म्हणाले, “अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही वरिष्ठ सभागृहात पाठवलात. त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. त्या मिटकरीमुळे तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार आहात? हा मिटकरी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आणि याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं. युपीएससीचा लाँग फॉर्म तरी माहिती आहे का? अमोल मिटकरी हा कोणत्यातरी समाजाला टार्गेट करतो, हा नकलाकार आहे. अजित दादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळं करायला लावणार. तुम्ही या पाळलेल्या श्वानाला आवरा.”
यावेळी त्यांनी छगन भुजबळांबाबतही प्रतिक्रिया दिली. “छगन भुजबळ हे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे नाहीत. भुजबळसाहेब ताठ मानेनं उभे राहतील, तेव्हा महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल. आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो. तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जबाबदारीची जाणीव करून द्या.
मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीबद्दल ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही दहा टक्के मतांच्या बेरजेसाठी या गोष्टी करत असाल तर 50 टक्के मतं वजा झालेली असतील. तुमचा डीएनए ओबीसीचा आहे असं सांगितलं आहे. मात्र, तो दिसून येत नाही. दहा टक्के मतासाठी 50% मतं विसरून जा, एवढं मुख्यमंत्र्यांना नक्की सांगेन. हे प्रकरण कोर्टात जाईल, सुनावण्या होतील तोपर्यंत पंचायतराज निवडणूक होतील. त्यामुळे निवडणुकीसाठी हे केलं का असे अनेक प्रश्न आहेत.”
