अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांचे भिक मांगो आंदोलन, भिकाऱ्याचे डोळेही पाणावले….!
राज्य सरकारला जाग यावी, यासाठी अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी भीक मांगो आंदोलन केले. भिकेला आलेल्या सरकारला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भिक देण्यात आली.

अकोला : राज्यामध्ये एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अकोला आगार क्रमांक एकवर कर्मचाऱ्यांनी यात सहभागी घेतला. सरकारला जाग यावी, यासाठी त्यांनी गुरुवारी भीक मांगो आंदोलन केले. भिकेला आलेल्या सरकारला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भिक देण्यात आली.
कर्मचाऱ्यांची अवस्था भिकाऱ्यांपेक्षाही बेकार
भिक मागत असताना एका भिकाऱ्याने या एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती भिकाऱ्यांपेक्षाही वाईट झाली आहे असं म्हटले. बोलताना अक्षरशः त्या भिकाऱ्याचे डोळे पाणावले. भिक मांगो आंदोलनात एक भिकारीही सहभागी झाला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी भिक मागून त्यातून जमा होणारी रक्कम जिल्ह्याधिकाऱ्यांच्या कोषागारात जमा केली.
नागपूर शहरातील ६४ एसटी कर्मचारी निलंबित
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संपाची सुरुवात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून झाली. या संपाचा त्यांचा 12 वा दिवस आहे. त्यानंतर साकोली, भंडारा, नागपूर अशा डेपोंच्या बस बंद करण्यात आल्या. नागपूर शहरात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. बसचा प्रवास बंद असल्याने शहरात खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. तरीही प्रवाशांकडून काही खासगी प्रवासी अधिकची रक्कम वसूल करतात. कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानं नागपूर शहरात आतापर्यंत 64 एसटी कर्मचारी निलंबित झाले आहेत. नागपूर बसस्थानक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे.
खासगी वाहतूकदारांची दिवाळी
नागपूर विभागात एसटीचे जवळपास अडीच हजार कर्मचारी आहेत. रोज साडेचारशे बस धावतात. सुमारे 15 हजार प्रवासी एसटीने प्रवास करतात. परंतु, एसटी ठप्प झाल्यानं आता खासगी वाहतूकदारांना चांगला वाव मिळाला आहे. ते अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे घेऊन प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस करीत आहेत. पण, त्यांची संख्या अपुरी असल्यानं खासगी वाहतूकदारांची सध्या दिवाळी सुरू आहे.
इतर बातम्या :
Nashik Gold: सोन्याची गगन भरारी, 24 कॅरेटचे दर 50 हजारांच्या पल्याड!
