शिवसेना राष्ट्रवादीची? जयंत पाटील यांच्या ‘त्या’ विधानावर दीपक केसरकर यांचं शिक्कामोर्तब?; वाचा नेमकं काय म्हटलंय?
बेळगावातील नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. सरकार म्हणून आम्ही कायम त्यांच्या पाठिशी राहणार आहोत. कर्नाटकात निवडणूक आली आहे. त्यामुळे त्यांचीही काही अडचण असू शकेल.

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना असं जयंत पाटील म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे जयंत पाटील यांच्या या विधानावर मान डोलवत सहमती दर्शवताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना ही राष्ट्रवादीची बी टीम असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता या मुद्द्यावरून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला टोले लगावले आहेत.
राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे काही चुकीचं नाही, असा चिमटा दीपक केसरकर यांनी काढला आहे. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली लोकं नको झाली आहेत. आम्ही परत येतो पण दोन्ही काँग्रेसलाला सोडा असं म्हणत होतो. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांनी तुम्ही देखील निघून जा म्हटलं होतं, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.
खोके घेणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या मागणीचा दीपक केसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यांनी खोके घेतले ते तुरुंगात जाऊन आलेत. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो ते ठोकशाहीची भाषा करतात.
आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत, पैशापेक्षा आमदारकी मोठी आहे. जे चार वेळा निवडून आले ते पैशासाठी फुटतील काय?, असा सवालच केसरकर यांनी राऊत यांना विचारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे प्रकरण क्लोज झाल्याचं नागपूर हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. भूखंड कुणालाही दिलेला नाही. संजय राऊत यांचं अज्ञान आहे. ज्या लोकांनी महापालिकेत काय काय केलं हे बाहेर येईल म्हणून हा आरोप केला जात आहे. आम्ही टीका केली की काय होतंय हे आता समोर आलंय.
संजय राऊत यांनी बोलत रहावं. टीका करत रहावं. आम्ही काम करत राहतो, असं सांगतानाच त्यांनी एखादी सूचना मांडली असती तर आनंद झाला असता, असा चिमटा त्यांनी काढला.
बेळगावातील नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं पाहिजे. सरकार म्हणून आम्ही कायम त्यांच्या पाठिशी राहणार आहोत. कर्नाटकात निवडणूक आली आहे. त्यामुळे त्यांचीही काही अडचण असू शकेल, असं सांगतानाच बेळगावमधील मराठी बांधवांची नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घालून देणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
