Kolhapur bypoll | ‘आप’ची थेट कोल्हापुरात उडी, काँग्रेस आमदाराच्या जागेवरील पोटनिवडणूक लढणार

Kolhapur bypoll | 'आप'ची थेट कोल्हापुरात उडी, काँग्रेस आमदाराच्या जागेवरील पोटनिवडणूक लढणार
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आपची उडी
Image Credit source: टीव्ही9

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

भूषण पाटील

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 18, 2022 | 11:22 AM

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा (by-Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आम आदमी पक्ष आता महाराष्ट्रातही शिरकाव करु पाहत आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक ‘आप’ संपूर्ण ताकदीने लढणार आहे. ‘आप’कडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चाचपणी सुरु केली आहे.

2024 ची पूर्वतयारी

पंजाब मधील यशाने लोकांना नवा पर्याय दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जनता आपला स्वीकार करेल, असा विश्वास रंगा राचुरे यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही आमच्यासाठी 2024 ची पूर्वतयारी आहे, असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न असल्याचंही रंगा राचुरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

पोटनिवडणूक कधी?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

कोण होते चंद्रकांत जाधव?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं 2 डिसेंबर 2021 रोजी निधन झालं. हैदराबादमध्ये उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली होती. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे दोन वेळ आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत विजय मिळवला होता.

नगरसेविका पत्नीला तिकीट मिळणार?

चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना संधी देण्याची चर्चा आहे. त्या कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. पती काँग्रेसचे आमदार झाल्यानंतरही त्या भाजपमध्येच राहिल्या.

चंद्रकांत जाधव यांचा अल्प परिचय

यशस्वी उद्योजक म्हणून चंद्रकांत जाधव यांची महाराष्ट्रभर ओळख

2019 मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही जाधव यांचे होते घनिष्ठ संबंध

चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी कोल्हापूर महानगर पालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून होत्या कार्यरत

शांत मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख त्यांनी निर्माण केली

संबंधित बातम्या :

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी होणार मतदान?

Chandrakant Jadhav | कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें